"जेव्हा आम्ही गाडीने प्रवास करायचो तेव्हा स्पीड ब्रेकर आले की माझं यकृत वर खाली व्हायचं. डाव्या वळणावर यकृत डावीकडे तर उजव्या वळणावर यकृत उजवीकडे झुकायचं, कारण खूप जागा रिकामी झाली होती. रात्री केवळ सरळ झोपायची सूचना मला दिली होती."
भोपाळ मध्ये राहणाऱ्या अॅथलिट अंकिता श्रीवास्तवने बीबीसीशी बोलताना तिची ही आगळवेगळी कहाणी सांगितली.
अंकिताने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आईला स्वतःच्या यकृताचा 74 टक्के भाग दान केला. आणि त्यानंतरही मैदानी खेळांची निवड केली. शिवाय यातही अभूतपूर्व यश मिळवलं.
अंकिता अनेक स्टार्टअप कंपन्यांचीही मालकीण आहे. पण हे सर्व करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.
अंकिता 13 वर्षांची असताना तिच्या आईला 'लिव्हर सिरोसिस' नावाचा आजार असल्याचं निदान झालं. यात यकृताचं प्रत्यारोपण करणं हा एकमेव उपाय होता.
अंकिता सांगते की, जेव्हा तिला समजलं की, तिच्या आईसाठी तिचं यकृत देता येणं शक्य आहे, तेव्हा हो बोलण्यासाठी तिने क्षणाचाही विलंब लावला नाही. पण तेव्हा ती लहान होती, त्यामुळे ती 18 वर्षांची होईपर्यंत वाट बघावी लागली.
शस्त्रक्रियेनंतर आलेल्या अडचणी
या काळात आईला दुसरं यकृत मिळेल अशी अपेक्षा होती पण तसं काही घडलंच नाही आणि वयाच्या 18 व्या वर्षी अंकितावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
अंकिता सांगते की, ज्या उत्साहाने ती शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाली होती, शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती तितकीच खालावली होती.
तोपर्यंत भारतात यकृत प्रत्यारोपणाबद्दल फारशी माहिती नव्हती. किंवा मग शस्त्रक्रियेसाठी आणि नंतर येणाऱ्या परिस्थितीसाठी रुग्णाने मानसिकदृष्ट्या कसं तयार राहिलं पाहिजे याविषयी लोकांना माहिती नव्हती.
प्रत्यारोपणानंतर अंकिता शुद्धीवर आली तेव्हा तिच्या संपूर्ण शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या लहान यंत्रांच्या तारा गुंडाळल्या होत्या. ती सांगते की तिच्या हाताला मॉर्फिनच्या इंजेक्शनची ट्यूब जोडली होती. ती शुद्धीवर येताच, ती वेदनेने विव्हळू लागायची. अशात मग नर्स येऊन त्या औषधाचा एक डोस रिलीज करायची. बरेच दिवस हे असंच सुरू होतं.
यकृताचा जवळपास तीन-चतुर्थांश भाग काढल्यामुळे पोटाच्या आतील जागा रिकामी झाली होती. त्यामुळे तिला हालचाल करणं अवघड झालं होतं.
आईचा जीव वाचला नाही..
अंकिता सांगते, "प्रत्यारोपणानंतर दोन ते तीन महिन्यांतच माझ्या आईचं निधन झालं. एकाच वेळी हे सगळं घडत असताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मी खचले होते. मला सुरुवातीपासून सगळं शिकावं लागलं. जसं की बसणं, उभं राहणं, चालणं या सर्वच गोष्टी."
अंकिताच्या म्हणण्यानुसार, आईच्या मृत्यूनंतर तिचे वडील त्या दोघी बहिणींपासून दुरावले. दोघी बहिणी आजी-आजोबांसोबत राहू लागल्या, त्यामुळे घरखर्च बघण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आली.
प्रत्यारोपणापूर्वी अंकिता ही राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आणि फुटबॉलपटू होती. अंकिता सांगते की, प्रत्यारोपणामुळे तिला पुन्हा खेळात सहभागी होता येईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण या सर्व मानसिक आणि शारीरिक अडचणींनंतरही खेळाडू म्हणून तिने कधीच हार मानली नाही.
"चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे"
अंकिताच्या म्हणण्यानुसार, प्रत्यारोपण पूर्ण झाल्यानंतर अचानक आयुष्य किती बदललंय याची तिला जाणीव झाली.
ती सांगते, "यातून बरं व्हायला तिला सुमारे दीड वर्ष लागले. त्यानंतर तिला वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्सबद्दल माहिती मिळाली. तिची भारतीय संघात निवड झाली."
"एका सामान्य निरोगी व्यक्तीच्या तुलनेत हे किती अवघड आहे हे मला त्यावेळी समजलं. पण चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली असते. जर तुम्ही कोणतं काम चिकाटीने केलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता."
अंकिता एकाबाजूला खेळामध्ये परतण्यासाठी नव्याने सराव करत होती तर दुसऱ्या बाजूला नोकरी.
ती सांगते की, सकाळचे काही तास सराव करून ती ऑफिसला जायची आणि ऑफिसमधून परतल्यावर पुन्हा सराव करायची.
प्रत्यारोपणानंतर अंकिताने 2019 मध्ये ब्रिटनमध्ये आयोजित वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये लाँग जम्प आणि थ्रोबॉल स्पर्धेत तीन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली आहेत.
खेळ आणि व्यवसाय
अंकिता आज एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तर आहेच पण त्यासोबतच एक प्रेरणादायी वक्ती आणि व्यावसायिक देखील आहे.
तिने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात स्टार्टअप सुरू केले आहेत आणि भविष्यात तिला आणखी बरंच काही करायचं आहे.
प्रत्यारोपणानंतर अंकिताच्या जीवनशैलीत अनेक मोठे बदल झाले. ती सांगते की, प्रत्यारोपणानंतर तिने जंक फूड जसं की बर्गर, पिझ्झा किंवा घराबाहेरचे इतर कोणतेही पदार्थ खाल्लेले नाहीत.
जेव्हा ती मैत्रिणींसोबत बाहेर जाते तेव्हा ती आपल्या सोबत स्वतःच्या खाण्याच्या गोष्टी घेऊन जाते. एवढ्या सगळ्या अडचणींनंतर देखील तिला आयुष्यात अनेक वेगवेगळे अनुभव घ्यायचे आहेत.
व्यावसायिक खेळ असोत किंवा साहसी खेळ जसं की, स्काय डायव्हिंग, डीप सी डायव्हिंग... अंकितला हे सर्व अनुभव घ्यायचे आहेत.
याविषयी ती सांगते, "माझ्या आईजवळ एक काळया रंगाची डायरी होती, ज्यात तिने बरंच काही लिहून ठेवलंय. जसं की माझ्या बहिणीचं लग्न, तिच्या लग्नात कोण कोण पाहुणे येणार, ऑफिसमध्ये काय-काय करायचं आहे, कोणाच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत. पण हे सगळं एका क्षणात संपलं आणि ती डायरी तशीच राहिली.
ती म्हणते, "मी रोज सकाळी उठते आणि स्वतःला आठवण करून देते बऱ्याचश्या लोकांचं झोपेतच निधन होतं. त्यांनी बरीच स्वप्न पाहिली असतील, जी पूर्ण होत नाहीत. मी खूप भाग्यवान आहे की, मला हा दिवस बघायला मिळतोय. आणि मी शक्य तितके अनुभव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करीन."
"यातून मला बरेचसे नवे अनुभव मिळतात. काहींमध्ये यश मिळतं तर काही ठिकाणी अपयश. पण यामुळे आयुष्यात खूप साऱ्या चांगल्या गोष्टीही समाविष्ट होतात."
"दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे"
अंकिताचं म्हणणं आहे की, आयुष्य कोणासाठीही सोपं नाही पण तरीही आपण इतरांबद्दल दया आणि करुणा बाळगली पाहिजे.
ती म्हणते, "जेव्हा कोणी एखाद्या समस्येबद्दल आपल्याला सांगतो तेव्हा त्यांची अडचण किती लहान आहे हे सांगणं चुकीचं आहे. तुमच्यासोबतच खूप काहीतरी मोठं घडलंय असं वागणं चुकीचं आहे."
ती सांगते की, आपल्याला दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची सवय लावली पाहिजे.
अंकिताला तिच्या पुढील आयुष्यात आरोग्याच्या क्षेत्रात काम करायचं आहे. ती सांगते लोकांसाठी कोणत्याही आजारावर उपचार घेणं अवघड असलं नाही पाहिजे.
तिच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल बोलताना ती म्हणते, "आम्ही असे रेडिएशन सेंटर्स उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, जिथे सामान्य लोकांना देखील येता येईल. यातून त्यांना कर्करोगाचं निदान आणि उपचारांसाठी वाट पाहावी लागणार नाही."
अंकिता सांगते, जर आईचं आयुष्य वाचवण्यासाठी मला पुन्हा एकदा यकृत दान करावं लागलं असतं तरी मी ते केलं असतं. पण प्रत्यारोपण होऊनही ती तिच्या आईचा जीव वाचवू शकली नाही. पण तिच्या या निर्णयाचा तिला अजिबात पश्चाताप नाही.
तिला आयुष्यात खूप काही करायचं आहे त्यामुळे ती म्हणते, "मी व्यवसाय करते म्हणून मी खेळू शकत नाही का? आणि खेळाडू असताना मी माझ्या आईला जीवनदान देऊ शकत नाही का? करायचं असेल तर सर्व काही करता येतं. आणि माझ्या जगण्याचं तत्वज्ञान हेच आहे. मला आशा आहे की, लोक माझ्या या विचाराने नक्कीच प्रेरित होतील."