भारताच्या एम सी मेरी कोमने आशियाई महिला बॉक्सिंगच्या इतिहासात पाचव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे. मेरी कोमने 48 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मीचा 5-0 असा धुव्वा उडवला. व्हिएतनाममधल्या हो चि मिन्ह शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मेरी कोमने 2014 सालच्या एशियाडनंतर मिळवलेलं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक ठरलं.
या कामगिरीने तिच्या आशियाई महिला बॉक्सिंगमधल्या पदकांची संख्या सहावर गेली आहे. या स्पर्धेत 35 वर्षीय मेरी कोमने आजवर 2003, 2005, 2010 आणि 2012 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं, तर 2008 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. आता 2017 मध्ये पुन्हा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली.
एक वर्षानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये परतलेल्या मेरी कोमने सुवर्ण पदक जिंकत दमदार कमबॅक केलं.