Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीकांतला फ्रेंच ओपनचे जेतेपद

श्रीकांतला फ्रेंच ओपनचे जेतेपद
पॅरिस , सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (12:14 IST)
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या भारताच्या किदंबी श्रीकांतचा सुवर्णयुग सुरूच आहे. 24 वर्षीय श्रीकांतने पाच महिन्यात चौथ्यांदा आणि आठवड्याभरात दुसऱ्यांदा सुपर सीरीजवर कब्जा केला आहे. फ्रेंच ओपन सुपर सेरीज बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने जपानच्या केंटा निशिमोटो याचा 21-14, 21-13 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी त्याने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकली होती.
 
फ्रेंच ओपन सुपर सेरीज बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात के. श्रीकांतने जपानच्या केंटा निशिमोटोचे आव्हान केवळ 35 मिनीटांत परतावून लागले. के. श्रीकांतने पहिला गुण मिळवित सामन्यात खाते उघडले. त्यानंतर 4-4 अशी बरोबरी असताना केंटा निशिमोटो सलग तीन गुण घेत 8-5 अशी आघाडी घेतली. पहिल्या सेटच्या मध्यानंतर 11-9 अशा पिछाडीवर असलेल्या श्रीकांतने 15-11 अशी सरशी केली. त्यानंतर 24-14 असा पहिला सेट सहज जिंकला.
 
दुसऱ्या सेटमध्येही श्रीकांतने निशिमोटोला एकही संधी न देता आगेकूच करत 7-2 अशी मोठी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत दुसरा सेटही 21-13 असा जिंकत के. श्रीकांतने जेतेपदावर शिक्‍कामोर्तब केला. श्रीकांतचा निशिमोटोवर हा दुसरा विजय ठरला. यावर्षी एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनमध्ये श्रीकांतने त्याचावर 21-12स 21-11 अशी मात केली होती.
 
तत्पूर्वी उपान्त्य फेरीत श्रीकांतने भारताच्याच एच. एस. प्रणयचा 14-21, 21-18, 21-19 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर अव्वल महिला खेळाडू पी. व्ही. सिंधूचे आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले होते.
 
दरम्यान, मागील रविवारी (दि. 22) श्रीकांतने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचा किताब जिंकला होता. या जेतेपदासह श्रीकांतने सायना नेहवालचा एका वर्षात तीन सुपर सीरीज जिंकण्याचा विक्रम मोडला होता. श्रीकांतचे कारकिर्दीतील हे सहावे जेतेपद आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनोखी ‘सेल्फी विथ काऊ’ स्पर्धा