मेलबर्न- रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये तीन तास पाच मिनिटे चाललेल्या सामन्यात रॉजर फेडररने देशबंधु स्टॅनिस्लास वावरिंका याला पराजित केले. पाच सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात फेडररने वावरिंकास 7-5,6-3,1-6,4-6,6-3 असे पराभूत केले.
35 वर्षीय फेडरर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा दुसरा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला आहे. याआधी, केन रूसवेल्ट या 39 वर्षीय टेनिसपटूने 1974 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
येणारा अंतिम सामना हा फेडरर याचा 28 वा ग्रॅंड स्लॅम अंतिम सामना असणार आहे. फेडरर याने याआधी चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. त्याने कारकिर्दीत एकूण 17 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत.