भारताने चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा जिंकून या स्पर्धेवर आपल नाव कोरल आहे. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-2 ने पराभूत केले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला .18 व्या मिनिटाला भारताचं गोलचं खात उघडल.
स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणा-या रूपिंदरपाल सिंगने 18 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये केले. लगेचच अफ्फान युसूफने दुसरा गोल नोंदवत भारताची आघाडी 2- 0 ने वाढवली. मात्र, थोड्या वेळातंच पाकिस्तानने पाठोपाठ दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. उत्सुकता ताणली गेली असताना निक्किन थिमाय्याने रूपिंदरपाल सिंगच्या पासवर अप्रतिम गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्तानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी दवडली, आणि भारताने विजेतेपदावर नाव कोरले.