कोरोना संसर्गामुळे जुलैमध्ये कशी परिस्थिती असेल, याची खात्री नाही. परंतु टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वेळापत्रकानुसारच पार पडणार, असा दावा संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी सत्ताधारी लिबरल डोमेक्रेटिक पार्टीच्या सदस्यांना केला आहे.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा घ्याव्यात की घेऊ नयेत, या चर्चा आता मागे पडल्या आहेत. याऐवजी स्पर्धा कशा प्रकारे घेता येईल ही चर्चा महत्त्वाची आहे, असे मोरी यांनी सांगितले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द होऊ शकते, अशा चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी ही शक्यता फेटाळली होती.
ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार असून, यात 11 हजार क्रीडापटूंसह 10 हजार अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, प्रक्षेपण कर्मचारी, पुरस्कर्ते, सामनाधिकारी, विशेष अतिथी यांचा समावेश असेल. 24 ऑगस्टपासून सुरू होणार्याक पॅरालिम्पिक स्पर्धेत 4 हजार 400 क्रीडापटू अपेक्षित आहेत. ताज्या सर्वेक्षणात 80 टक्के जपानच्या नागरिकांनी ऑलिम्पिक रद्द करावे किंवा पुढे ढकलावे, असे म्हटले आहे.