स्वतंत्र भारताचे नाव ऑलिम्पिकच्या तक्त्यावर (वैयक्तिक क्रीडाप्रकारात) प्रथम कोरणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ के. डी. जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्र्वर या छोट्या खेड्यात झाला.
त्यांचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये १९४०-४७ या दरम्यान झाले. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातील वातावरणही कुस्तीमय होते. शालेय जीवनातच त्यांनी कुस्तीबरोबरच भारोत्तोलन(वेटलिफ्टिंग), जलतरण, धावणे, जिम्नॅस्टिक, मल्लखांब आदी खेळांतही यश मिळविले होते.
१९४८ च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन मल्लाला पहिल्या काही मिनिटांतच चीतपट करून प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले आणि ५२ किलो फ्लायवेट गटात सहावे स्थान मिळविले. वैयक्तिक क्रीडाप्रकारात ऑलिंपिकमध्ये १९४८ पर्यंत इतक्या वरचा क्रमांक मिळविणारे ते पहिले भारतीय क्रीडापटू ठरले. संपूर्ण देशात मॅटवरची कुस्ती माहीत नसताना त्यांनी मॅटवर हे यश मिळवले हे विशेष !
लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागूनही निराश न होता पुढील हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेसाठी खाशाबांनी जय्यत तयारी सुरू केली. हेलसिंकीमध्ये खाशाबा १२५ पौंड बॅटमवेट गटात सहभागी झाले होते. या गटात 24 देशांतील मल्लानी भाग घेतला होता. कॅनडा, मेक्सिको, जर्मनी या देशांच्या मल्लाचा पराभव करत, अखेर 23 जुलै, 1952 रोजी या स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले, एक अभूतपूर्व इतिहास घडवला. भारतीय क्रीडा-इतिहासात ऑलिंपिकमध्ये अजोड कामगिरी करणारे खाशाबा जाधव हे पहिलेच ऑलिंपिकवीर ठरले. पण दुर्देवाने आज 24 जुलै 2017 रोजी त्यांचे मेडल लिलावासाठी काढण्यात आले आहे.
भारताला खाशाबा यांच्यानंतर तब्बल 44 वर्षे ऑलिंपिकमध्ये मेडल मिळविण्यासाठी वाट बघावी लागली. पण आज खाशाबा यांच्या मेडलची विक्री होण्याअगोदर क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जाग येईल का हे बघणे फारच गरजेचे आहे?