आशियाई सांघिक चॅम्पियनशिपद्वारे गेल्या महिन्यात कोर्टवर परतलेली पीव्ही सिंधू चार महिन्यांनंतर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत केवळ सिंधूच नाही तर देशातील सर्व अव्वल शटलर्स आपला खेळ दाखवणारआहेत.
पॅरिस ऑलिम्पिकच्या तिकिटासाठी या स्पर्धेतून आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेषत: जागतिक क्रमवारीत 19, 24व्या स्थानी असलेला लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत खडतर ड्रॉ असूनही प्रभाव पाडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतील. गेल्या तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जागतिक क्रमवारीतील अव्वल जोडीवर सर्वांचे लक्ष असेल.
दुखापतीमुळे कोर्टपासून दूर असलेली सिंधू मिशेल ली विरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करेल.भारताला
आशियाई सांघिक अजिंक्यपद विजेतेपद मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने या स्पर्धेत तीन एकेरी सामने खेळले, दोन जिंकले आणि एक हरला, पण ही स्पर्धा जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूसाठी महत्त्वाची ठरणार आहे. येथे पहिल्या फेरीत तिचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी होईल. दुसऱ्या फेरीत तिचा सामना जुनी प्रतिस्पर्धी स्पेनच्या कॅरोलिना मारिनशी होऊ शकतो.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला आणि इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीतील एचएस प्रणॉयचा पहिल्या फेरीत सामना चीनच्या लू गुआंग झूशी होणार आहे. लक्ष्यासमोर जपानच्या कांता सुनेयामाचे कडवे आव्हान असेल, तर श्रीकांतला तैवानच्या चाऊ तिएन चेनचे आव्हान असेल. उदयोन्मुख शटलर प्रियांशु राजावतची लढत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनशी होणार आहे. महिला दुहेरीत त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद यांच्याशिवाय अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रास्टोही ऑलिम्पिकच्या तिकीटासाठी प्रयत्न करतील