भारताची अव्वल महिला शटलर पीव्ही सिंधूने थायलंड ओपन 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अकाने यामागुचीला पराभूत करून आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला.
सहाव्या मानांकित सिंधूने गतविजेत्याविरुद्ध सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला आणि पहिला सेट 21-15असा जिंकला. मात्र, जपानच्या खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत 22-20 असा विजय नोंदवला. मात्र अंतिम आणि निर्णायक सामन्यात सिंधूने जोरदार पुनरागमन करत हा सेट 21-13 असा जिंकून सामना जिंकला.
सिंधूचा पुढील सामना शनिवारी तिसऱ्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या मानांकित चीनच्या चेन यू फेईशी होणार आहे. उपांत्य फेरी गाठणारी सिंधू ही एकमेव खेळाडू आहे.
सिंधूने याआधी प्री-क्वार्टर फायनलमध्ये कोरियाच्या सिम यू जिनचा 37 मिनिटांत पराभव केला होता. त्याचवेळी थॉमस कपमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या किदाम्बी श्रीकांतने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली. त्याने दुसऱ्या फेरीत आयर्लंडच्या न्हाट गुयेनला वॉकओव्हर दिला.