भारतीय बॉक्सर दीपक भोरियाने रविवारी टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कझाकिस्तानच्या साकेन बिबोसिनोव्हचा पराभव करत जागतिक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक विजेता अमित पंघालच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या दीपकने शेवटच्या तीन मिनिटांत आक्रमक खेळ करत सामना जिंकला. भारतीय बॉक्सरने 2021 च्या विश्वविजेत्या साकेनचा 5-2 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. दीपकने सामन्याची सुरुवात संथगतीने केली आणि त्याला लय शोधण्यात थोडा वेळ लागला. याचा फायदा घेत साकेनने त्याच्यावर काही ठोसे मारले. त्यानंतर दीपकने माजी विश्वविजेत्या बॉक्सरवर वर्चस्व राखत तिसऱ्या फेरीत आपली लय पकडली. दीपक पुढील सामन्यात चीनच्या झांग जिमाओविरुद्ध रिंगमध्ये उतरेल.
हुसामुद्दीनने (57 किलो) रशियाच्या एडुआर्ड सॅविनचा 5-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. पुढील फेरीत त्याचा सामना अझरबैजानच्या उमिद रुस्तमोवशी होणार आहे.