Publish Date: Sat, 07 Feb 2026 (12:44 IST)
Updated Date: Sat, 07 Feb 2026 (12:51 IST)
प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण नेहमी लाल गुलाबाचा विचार करतो, पण तुम्हाला माहीत आहे का? गुलाबाचा प्रत्येक रंग एका वेगळ्या भावनेची साक्ष देतो. मैत्री असो, आदर असो किंवा नवीन सुरुवात, प्रत्येक प्रसंगासाठी निसर्गाने गुलाबाचे वेगवेगळे रंग बहाल केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या रंगाचं गुलाब काय संदेश देतं:
१. लाल गुलाब (Red Rose) – प्रेमाची उत्कटता
लाल गुलाब हे निखळ आणि उत्कट प्रेमाचं प्रतीक आहे. 'आय लव्ह यू' म्हणण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा असूच शकत नाही. जेव्हा तुम्हाला कोणाबद्दल मनापासून ओढ वाटते किंवा तुमचं प्रेम व्यक्त करायचं असतं, तेव्हा लाल गुलाब दिला जातो.
२. पिवळा गुलाब (Yellow Rose) – मैत्रीचा ओलावा
पिवळा रंग हा आनंद आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. पिवळा गुलाब खास करून मैत्रीसाठी दिला जातो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी मैत्रीची सुरुवात करायची असेल किंवा तुमच्या जुन्या मित्राला "तू माझ्यासाठी खास आहेस" हे सांगायचं असेल, तर पिवळा गुलाब नक्की द्या.
३. पांढरा गुलाब (White Rose) – शांतता आणि शुद्धता
पांढरा रंग हा पवित्रता, शांतता आणि साधेपणा दर्शवतो. लग्नसोहळ्यात किंवा एखाद्या नवीन नात्याची सुरुवात करताना पांढरा गुलाब देण्याची पद्धत आहे. तसेच एखाद्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी किंवा 'तुझी आठवण येतेय' हे सांगण्यासाठीही याचा वापर होतो.
४. गुलाबी गुलाब (Pink Rose) – कृतज्ञता आणि कौतुक
गुलाबी गुलाब हे कोमलता आणि आनंदाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला कोणाचे आभार मानायचे असतील किंवा कोणाच्या सौंदर्याचं आणि स्वभावाचं कौतुक करायचं असेल, तर गुलाबी गुलाब हा उत्तम पर्याय आहे.
५. नारंगी गुलाब (Orange Rose) – उत्साह आणि ओढ
नारंगी रंग हा उत्साह आणि ऊर्जेचा रंगा आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप उत्सुकता असते किंवा कोणाबद्दल तीव्र आकर्षण वाटत असतं, तेव्हा नारंगी गुलाब दिला जातो. हे मनातील तीव्र भावना व्यक्त करण्याचं साधन आहे.
६. जांभळा गुलाब (Lavender Rose) – पहिल्या नजरेतील प्रेम
जांभळा किंवा लॅव्हेंडर रंगाचा गुलाब खूप दुर्मिळ असतो. हा रंग 'पहिल्या नजरेतील प्रेमाची' साक्ष देतो. एखाद्याच्या मोहात पडला असाल, तर हा रंग तुमच्या मनातील जादू सांगून जातो.
७. पीच गुलाब (Peach Rose) – नात्यातील प्रामाणिकपणा
पीच रंगाचे गुलाब साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा दर्शवतात. महिलांना ते विशेषतः आवडतात. नातेसंबंधात विश्वास आणि प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी पीच गुलाब परिपूर्ण आहेत.
८. निळा गुलाब (Blue Rose) – संवेदनशीलता आणि भावना
निळे गुलाब संवेदनशीलता आणि भावना सामायिक करण्यासाठी एक माध्यम आहेत. काही लोक त्यांच्या भावना अधिक खोलवर व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या दिवशी त्यांची निवड करतात.
पुढच्या वेळी कोणाला गुलाब देताना फक्त फूल देऊ नका, तर त्या रंगामागची भावनाही लक्षात ठेवा!