आज आषाढी एकादशी. पंढरपूरची यात्रा. देहू-आळंदीहून संतांच्या पालख्या चालत पंढरीत येत असत. पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होत असत. वारकरर्यांसाठी हा अनुपम् सोहळा होत असे. यंदा कोरोना महामारीमुळे वारीवर बंधनआले. तरीही अपार श्रद्धेने सरकारी नियम पाळून पालख्या पंढरीत जाणार आहेत. विठ्ठलाची महापूजाही होणार आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या श्री शुभराय मठात आषाढी एकादशी सोहळा सरकारी नियम पाळूनच होणार असला तरी पंढरपूर आणि सोलापूर येथील विठ्ठल-परब्रह्माचे दर्शन रोज आपल्याला घडणार आहे. पुंडलिकासाठी जसा वैकुंठीचा देव पंढरीत येऊन उभा ठाकला तसाच तो श्री शुभराय महाराजांच्यासाठीदेखील शुभराम मठात येऊन प्रतिष्ठा पावला. त्याची हकीकत विलक्षण अशी आहे. श्री शुभराय महाराजांना श्री विठ्ठलाने दृष्टांत दिला की, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न होऊन तुझ्याकडे येणार आहे. चंद्रभागेतील पुंडलिकाच्या डोहातून तू मला वर काढ आणि सोलापूरला मठात स्थापना कर. श्री महाराजांचे भक्त शेटे हे पंढरीला गेले. त्यांनी डोहातून पांडुरंगाची मूर्ती काढली आणि ती घेऊन ते सोलापुरी आले. या विठ्ठलमूर्तीची स्थापना 1785 मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी मठात करण्यात आली. तेव्हापासून आषाढी एकादशीस रथही निघतो. हा सर्व तपशील सांगण्याचे कारण म्हणजे पांडुरंग जसा पंढरीत आहे तसाच तो सोलापुरातही आहे. श्री शुभराय महाराजांनी चित्रकलेतून कर्मयोग, अभंगातून ज्ञानयोग आणि दास्भक्तीने भक्तियोग अशा पारमार्थिक त्रिमितीत आपले कार्य केले आहे.
उपदेशपर अभंग : श्री शुभराय महाराजांनी एकूण 147 अभंग लिहिले आहेत. त्यापैकी आज इथे विवरणासाठी 'आश्रय करी हरिचरणाचा' हा अभंग (क्र. 7) घेतला आहे. श्रीहरी या शब्दाचा वापर त्यांनी श्रीविठ्ठल-परब्रह्म या संदर्भाने केला आहे.
श्री शुभराय महाराजांनी या अभंगात तुम्हा-आम्हाला असा बोध केला आहे की, तुम्ही सर्वजण प्रापंचिक असलात तरी काही थोडा परमार्थ करून ईश्वरदर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्या. ईश्वरदर्शन केव्हा घडून येईल? तर तुम्ही श्रीहरिचरणाचा म्हणजे नाम आणि नीती या दोन्ही आचरणाचा वापर आपल्या जीवनात केला तर तुम्हाला त्यायोगे देवदर्शन घडून येऊ शकेल. प्रापंचिक कर्तव्यापुरता शरीराचा मोह धरला तर तो क्षम्य आहे. पण कर्तव्य करूनही शरीराचा मोह (आसक्ती) धराल तर या जन्मात परमार्थ कधीच घडून येणार नाही. मग ईश्वरदर्शन तर दूर राहिले. बाह्य सुखाच्या मोहात न पडता आत्मानंदामध्ये तल्लीन होऊन राहावे. भागवतग्रंथात ईश्वराने घडवून आणलेल्या अनेक लीला आहेत. त्यात प्रभूचे गुणगानच केलेले आहे. त्याचाच प्रसार कर. कर्मजन्म सुख-दुःखे कोणालाच चुकलेली नाहीत. ती भोगलीच पाहिजेत. पण तू जर परमार्धप्रवण राहिलास तर दुःखभोगावर मात करण्याचे मनोबल तरी तुला प्राप्त होऊ शकेल. स्वतःकडे दासपण (सेवकपण) घेऊन तू आपला जो प्रियतम श्रीहरी आहे, त्याला हृदयात साठव. जगात सर्वत्र भरून राहिलेल्या ऐर्श्वसंपन्न ईश्वराला किमान अंशरूपाने का होईना पण पाहा. त्यासाठीच तू हरिचरणांचा आश्रय घे. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलपरब्रह्माचे चरणी एवढेच मागणे आहे.