Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना: आता आपलं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होईल का?

कोरोना: आता आपलं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होईल का?
, बुधवार, 6 मे 2020 (14:55 IST)
सिद्धनाथ गानू

देशात तिसरं लॉकडाऊन सुरू झालं आहे. रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या पुढे गेलाय. प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रश्न आहेत की गोष्टी नॉर्मल कधी होणार?
कोरोनापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपण जसं आयुष्य जगत होतो, तसं आता आपण परत जगू शकू? की आता काही गोष्टी कायमच्या बदलल्या आहेत?
अनेक तज्ज्ञांच्या मते आता काही गोष्टी कायमच्या बदलू शकतात आणि पूर्वी जे नॉर्मल वाटायचं, ते आता होऊ शकणार नाही. आता अशा अनेक नवीन गोष्टी असतील ज्या आपल्यासाठी नॉर्मल झालेल्या असतील. पाहूया गोष्ट नव्या नॉर्मलची.. सोप्या शब्दांत.
 
नवं नॉर्मल म्हणजे काय?
चीनच्या ज्या वुहान शहरातून कोनोना व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात झाली, तिथे 76 दिवस लॉकडाऊन होतं. त्यानंतर जेव्हा गोष्टी सुरू झाल्या, तेव्हा त्या आधीसारख्या नव्हत्या. त्या शहराचा आणि तिथल्या लोकांचा चेहरामोहराच बदललेला होता.
जगात अनेक देशांमध्ये हेच होतंय. लॉकडाऊन करूनही कोव्हिड रुग्णांची संख्या काही शून्य होत नाहीये. लस यायला किमान वर्ष किंवा दीड वर्षापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. वर्ष-दीड वर्ष लॉकडाऊन करून ठेवणं कोणत्याही देशाला शक्य नाहीये.
या काळात आपल्याला आयुष्यात काही मूलभूत बदल करावे लागतील. या बदलांसकटचं जे आपलं आयुष्य असणार आहे, ते असेल आपलं नव नॉर्मल आयुष्य. ते स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही.
स्पेनने अलिकडेच आपला 'एक्झिट प्लॅन' अमलात आणायला सुरुवात केली. जून अखेरपर्यंत देशाला 'न्यू नॉर्मल'कडे न्यायचंय असं पंतप्रधान सांचेझ यांनी म्हटलंय,
ब्रिटनमध्ये सुद्धा याचीच चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्री सचिव डॉमिनिक राब यांनीही म्हटलं होतं की, ब्रिटनला लॉकडाऊन संपवण्यासाठी सगळे निर्बंध हटवून चालणार नाहीत. तर देशाला एका 'न्यू नॉर्मल'कडे जावं लागेल. शाळा-दुकानं सगळीकडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम आता कायम राहतील. पण त्याहून खूप जास्त बदल आपल्या आयुष्यात होऊ शकतात.
प्रवास आणि भटकंती बंद?
भारतात अजूनही विमानप्रवास बंद आहे. अनेक देशांनी तर प्रवासावर दीर्घकाळासाठी निर्बंध घातलेत. अर्जेंटिनाने सप्टेंबरपर्यंत सर्व विमानप्रवासावर बंदी घातलीय. युकेच्या एका मंत्र्याने अलिकडेच म्हटलं होतं की, लोकांनी उन्हाळ्याच्या सुटीत प्रवास करण्याचे प्लॅन करू नयेत.
अमेरिकेतल्या अनेक बड्या विमान कंपन्यांनी आपली विमानसेवा हळूहळू सुरू करत असताना आता प्रवाशांना तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना विमानातही मास्क लावून बसण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
हाँगकाँग एअरपोर्टवर तर फुल बॉडी सॅनिटायझर्स बसवले गेलेत. ते 40 सेकंदात सर्व जिवाणू आणि विषाणू मारू शकतात असा दावा इथल्या प्रशासनाने केलाय.
ब्रिटनमध्ये एअरपोर्टभर सॅनिटायझर्सची सोय केली गेलीय. अमेरिकेत Transport Security Administration ने सूचना दिल्या आहेत की, सिक्युरिटी स्क्रिनिंगपूर्वी आणि ते झाल्यानंतर प्रवाशांनी 20 सेकंद हात धुवावे.
आता विमानात किंवा ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये खेटून बसता येणार नाही. गर्दी करता येणार नाही. सध्या ग्रीन झोनमध्ये बसेस सुरू आहेत, तिथेही बसमध्ये क्षमतेच्या 50 टक्केच लोक प्रवास करू शकत आहेत. मजुरांसाठीच्या विशेष रेल्वे गाड्यांमध्येही अंतराअंतरावर लोक प्लॅटफॉर्मवर उभे होते आणि आत शिरल्यावरही अंतर राखूनच बसले-झोपले.
 
इटली हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. तिथे बीचवर सुटीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. युरोपातल्या इन्सटिट्यूट ऑफ टुरिझम रिसर्चचे उल्फ सोनटाग म्हणतात, "इटलीत समुद्रकिनाऱ्यावर सनबाथ घेत असणाऱ्या पर्यटकांना आपल्या सभोवती प्लेक्सिग्लासचे पडदे असण्याची सवय करून घ्यावी लागू शकते. सोशल डिस्टन्सिंग हे जर उद्दिष्ट असेल तर याची सवय करून घ्यावी लागेल. भूमध्य समुद्राजवळच्या रिसॉर्ट्समध्येही स्विमिंगपूल उघडतील असं वाटत नाही."
हे सगळं ऐकायला विचित्र, गंमतीशीर किंवा तद्दन कल्पनात्मक वाटेल पण युकेमधल्या Fresh Eyes या प्रवास कंपनीचे अँडी रुदरफोर्ड म्हणतात "लोक आंतरराष्ट्रीय प्रवास कमी करतील. 'स्टेकेशन'चा अर्थ बदलून तो प्रघात होईल."
स्टेकेशन म्हणजे घरातल्या घरात घालवलेलं व्हेकेशन किंवा सुटी.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने अलिकडेच केलेल्या एका सर्व्हेमध्ये 40% लोकांनी म्हटलं, की ते प्रवास करण्यासाठी 6 महिने वाट पाहतील.
2019 मध्ये जितक्या लोकांनी प्रवास केला ती पातळी गाठण्यासाठी 2023 साल उजाडू शकतं, असं बोईंग विमानकंपनीने म्हटलंय.
'वर्क फ्रॉम होम' आता नॉर्मल होणार
 
लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक 'वर्क फ्रॉम होम' करतायत. मी माझंच उदाहरण देतो- मी टिव्हीमध्ये काम करतो, रोज आम्ही तुमच्यापर्यंत एक डिजिटल टीव्ही बुलेटिन आणतो. स्टुडिओ, कॅमेरे, मेक-अप असा त्याचा मोठा पसारा असतो. पण आता गेला महिनाभर मी रोज माझ्या घरातून तुमच्यापर्यंत बातम्या आणतोय आणि जोवर निर्बंध आहेत तोवर मी आणि माझे सहकारी हे अशा पद्धतीने काम करणारच आहोत. त्यामुळे आता हा एक नवा नॉर्मल झालाय जो येणाऱ्या काळात सुरू राहू शकतो.
 
पण याचा कर्मचाऱ्यांच्या efficiency वर परिणाम होई शकतो का? चीनमधल्या एका बिझनेस स्कूलने 'वर्क फ्रॉम होम' संदर्भात एक सर्व्हे केला होता.
या सर्व्हेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी म्हटलं की, त्यांना 'वर्क फ्रॉम होम' करताना त्यांची कार्यक्षमता कमी झाल्याचं वाटतंय. 37 टक्के लोकांनी म्हटलंय, की त्यांना काहीच फरक वाटत नाहीय आणि 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांना ती वाढल्यासारखं वाटलं.
पण सगळे काही घरातून काम करू शकत नाहीत. कारखान्यात काम करणाऱ्यांनी काय करायचं? तिथे Physical distancing ठेवून सध्या काम केलं जाईल. पण निकट भविष्यात रोबॉटिक्स आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढू शकतो. कारण रोबोला साथीच्या रोगांचा धोका नसतो. त्यामुळे यंत्रांसोबत काम करणं हेही 'न्यू नॉर्मल'चा भाग असेल.
मुलांच्या अभ्यासाचं काय?
शाळा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी आता मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागतोय. अनेक मुलं घरूनच झूम, स्काईप वगैरेच्या माध्यमातून आपले तास पूर्ण करतायत. पण हे त्यांना शक्य आहे ज्यांना इंटरनेट आणि इतर गोष्टींचा access आहे. ज्या मुलांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही त्यांनी काय करायचं?
ज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यांच्याही वेगळ्या समस्या आहेतच. शाळेत असताना समवयस्क मुलांबरोबर होणाऱ्या संवादामधूनही आपण खूप काही शिकत असतो.
सतत घरात राहिल्याने मुलांच्या सामाजिक कौशल्यांचं काय होईल, अशी चिंताही अनेक पालकांनी बोलून दाखवलीय. शिवाय इतके तास कंप्युटर स्क्रीनसमोर बसून मुलं फोकस करू शकतील का, हा प्रश्नही विचारला जातोय. पण सध्यातरी ई-लर्निंग काही काळासाठी एक 'न्यू-नॉर्मल' असणार आहे यात शंका नाही.
मानवी संबंधांचं काय?
'माणूस हा सामाजिक प्राणी आहे' हे आपण शाळेत शिकलो आहोत. पण आता या समाजात वावरल्यामुळेच माणसाला जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आता कोव्हिड असतानाच्या जगात आपल्या भेटी-गाठी जास्त ऑनलाईन होतील.
कुठे भेटी झाल्या तरी चेहऱ्यांवर मास्क असतील. लोक मिठी मारायचं टाळतील. हँडशेकऐवजी नमस्कार करतील. तरुण-तरुणी प्रत्यक्षात भेटणं टाळून जास्तीत जास्त ऑनलाईन डेटिंग करतील.
 
आपण ज्याप्रकारे सोशली कनेक्टेड असतो ते कोव्हिडच्या आरोग्य संकटामुळे पूर्णपणे बदलून गेलंय असं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट भावना जानी नेगांधी म्हणतात.
 
त्या सांगतात, "एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला जाऊन मिठी मारावीशी वाटल्यानंतर काय करायचं हा संभ्रम आता लोकांच्या मनात आहे. अज्ञाताची भीती आणि अदृश्य धोक्यामुळे हा संभ्रम टिकून राहील. आपली लोकांशी जोडलं जाण्याची शैलीच बदलून जाऊ शकेल. या आरोग्य संकटाचे परिणाम आणि त्याचा आपल्याला आलेला अनुभव यातून आपण अधिक जपून पावलं टाकू."
 
लोकशाहीचं काय होईल?
एक प्रश्न लोकशाहीबद्दलही विचारला जातोय. कोव्हिड-19 ला आळा घालण्यासाठी नागरिकांची अधिकाधिक माहिती मिळवण्याकडे जगभरातल्या सरकारांचा कल आहे. पण पुढे जाऊन यातूनच आपल्या नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारं 'सर्व्हेलन्स स्टेट' तयार होईल, अशी भीतीही अनेकांनी बोलून दाखवलीय. यात चीनबद्दल आरोप झाले, आरोग्य सेतूवर टीका करताना काँग्रेसने भारत सरकारवरही तसेच आरोप केले.
 
कोरोना असताना आयुष्य नव्याने सुरू करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आली आहे. त्यामुळे बदललेलं जग कसं असेल, याचं नेमकं चित्र ठाऊक नसलं तरी एक सर्वसाधारण कल्पना येऊ शकते. त्या-त्या देशाचा न्यू नॉर्मल काय असेल हे येणारा काळच सांगेल. पण एक खरंय की, हा आजार पसरण्यापूर्वी आपण जग जसं पाहिलं होतं, अगदी तसंच ते येत्या काळात पाहायला मिळेल याची शक्यता कमीच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rabindranath Tagore Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे 10 सुविचार