गुरुवारपासून ट्वीटरवर #RippedJeansTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. याला कारण ठरलं ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलेलं वक्तव्य.
फाटकी जीन्स घातलेली महिला मुलांना कसे संस्कार देणार, असं वक्तव्य रावत यांनी केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक महिलांनी त्यांचे जीन्सवरचे फोटो टाकत मतं व्यक्त केली आहे.
काही जणींनी फाटलेल्या अर्थव्यवस्थेविषयी प्रश्न विचारले आहेत, तर काहींनी रावत यांना त्यांची मानसिकता सुधारण्याचा सल्ला दिला आहे. महिलांची ही मतं पाहण्याअगोदर रावत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊया.
देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलताना रावत म्हणाले, "मी एकदा विमानातून जात असताना पाहिलं की एक महिला तिच्या दोन लहान मुलांसह एकदम जवळ बसली होती. तिनं फाटकी जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की, ताई कुठे जायचं? तर दिल्लीला जायचं असं त्यांनी सांगितलं. तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत आणि ती महिला एक एनजीओ चालवते.
"त्यानंतर माझ्या मनात विचार आला की, जी महिला एक स्वयंसेवी संस्था चालवते आणि जिने स्वत: फाटकी जीन्स घातली आहे, ती महिला समाजात कोणते संस्कार पसरवेल? आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा असं काही नव्हतं."
महिलांचा पलटवार
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या शाखेदरम्यानचे जुने फोटो ट्वीट करत म्हटलंय की, "Oh my God! त्यांचे गुडघे दिसत आहेत."
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "कुणाचे गुडघे उघडे पडलेत याची उठाठेव करण्याऐवजी देशाच्या अर्थव्यवस्थेचा पार्श्वभाग उघडा पडलाय आणि सारं जग तो बघून हसतंय याची लाज बाळगा!"
शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना विचार बदलण्याचा सल्ला दिला आहे.
महिला नेत्यांव्यतिरिक्त इतर महिलांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
ट्वीटर यूझर पूनम शर्मा यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "फाटक्या विचारसरणीपेक्षा फाटकी जीन्स कधीही चांगली."
ट्वीटर यूझर आरती यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "हे काही आमच्या कपड्यांच्या पसंतीविषयी नाही, तर तुमच्या मानसिकतेविषयी आहे."
डॉ. ललिता सुप्पिया यांनी लिहिलंय, "मी आई आहे आणि मी फाटकी जीन्स घालते."
"माझी जीन्स, माझी चॉईस आहे. त्याचा माझ्या चारित्र्याशी संबंध जोडू नका," असं पल्लवी नावाच्या ट्वीटर यूझरनं लिहिलं आहे.
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांनी ट्वीट करत म्हटलंय, "किती मर्यादेतलं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य?"