Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलिया भट्टचं लग्न पारंपरिक धारणांना छेद देणारं पाऊल?

आलिया भट्टचं लग्न पारंपरिक धारणांना छेद देणारं पाऊल?
, शनिवार, 16 एप्रिल 2022 (08:29 IST)
- वंदना
अभिनेत्री आलिया भट्टचं लग्न हा म्हटलं तर तिच्या खासगी जीवनातील एक विधी आहे, पण या लग्न समारंभाचे इतरही काही आयाम आहेत. एके काळी हिंदी चित्रपटांमधील नायिकांना लग्न किंवा त्यांची सिने-कारकीर्द यातील एकाच पर्यायाची निवड करावी लागत असे.
 
गेल्या काही वर्षांमध्ये मात्र करीना कपूर, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आता आलिया भट्ट यांनी मात्र हा पायंडा मोडला आहे.
 
परंतु, 1980च्या दशकापासून एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंतचा काळ मात्र विचित्र होता. या काळात हिंदी चित्रपटांमधील नायिकांची कारकीर्द शिखरावर असली तरी लग्न झाल्यावर आणि प्रत्यक्ष जीवनात आई झाल्यावर त्यांची कारकीर्द उतरणीला लागत असे.
 
माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांसारख्या नट्या नव्वदीच्या दशकात कारकीर्दीच्या शिखरावर होत्या.
 
जूही चावलाचे एका मागून एक चित्रपट गाजले होते, पण तिच्या आईचं अचानक निधन झालं आणि खासगी जीवनात तिला अडचणींना सामोरं जावं लागलं. याच काळात तिची ओळख जय मेहता यांच्याशी झाली. दोघांमधली जवळीक वाढत गेली आणि जूहीने लग्न केलं. पण बराच काळ जूहीने या लग्नाची बातमी जाहीर केली नाही.
 
अनेक वर्षांनी जूही या संदर्भात बोलताना दिसली. पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत जूही म्हणाली होती, "त्यावेळी मी चित्रपटांमध्ये माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती आणि मी चांगलं काम करत होते. त्याच दरम्यान जय माझ्या आयुष्यात आले. लग्न केलं तर माझं करिअर थांबेल, अशी भीती मला वाटत होती. मला काम करायचं होतं, त्यामुळे लग्नाची बातमी लपवून ठेवणं हाच एक मार्ग मला दिसत होता."
 
म्हणजे एका यशस्वी अभिनेत्रीला स्वतःचं करिअर वाचवण्यासाठी असा विचार करावा लागला?
 
आमिर खान किंवा शाहरूख खान यांसारख्या जूहीसोबत काम केलेल्या नायकांना मात्र स्वतःचं लग्न लपवण्याची गरज पडली नाही.
 
अनेक वर्षं चित्रपटविश्वातील घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार भारती दुबे म्हणतात, "ऐंशीच्या दशकापासून एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटांचा काळ विचित्र होता. लग्नानंतर अभिनेत्रीचं करिअर संपतं, अशी धारणा या काळात रूढ झाली."
 
ऐंशीच्या दशकापूर्वी, विशेषतः 1950 ते 1970च्या दशकांमधील हिंदी चित्रपट अभिनेत्री तुलनेने अधिक स्वतंत्र असल्याचं दिसतं. त्यासाठी गतकाळाचा थोडा धांडोळा घ्यावा लागेल.
 
1950च्या दशकात नूतन यांनी 'नागीन', 'हम लोग' यांसारख्या चित्रपटांमधून कारकीर्दीला सुरुवात केली आणि 1952मध्ये त्यांना 'मिस इंडिया' स्पर्धेचं विजेतेपद मिळालं. 1955 साली प्रदर्शित झालेला 'सीमा' आणि 1959 सालचा 'सुजाता' या चित्रपटांमुळे नूतन आघाडीची नायिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
 
दरम्यान 1959 साली नूतन यांनी रजनीश बहल यांच्याशी लग्न केलं. पण त्यानंतरही त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं, आणि अखेरपर्यंत त्या चित्रपटांमध्ये काम करत राहिल्या.
 
'छलिया', 'बंदिनी', 'सरस्वती चंद्र', 'मिलन', 'सौदागर', 'मैं तुलसी तेरे आंगन की', 'मेरी जंग' हे त्यांचे चित्रपट लग्नानंतर प्रदर्शित झालेले होते आणि ते बहुतांशाने व्यावसायिक स्वरूपाचे चित्रपट होते, त्यात नूतन मुख्य नायिका होत्या, आणि त्यांना यातील बऱ्याच भूमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.
 
'बंदिनी'मध्ये एका कैद्याची भूमिका करत नूतन यांनी 1964 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. बिमल रॉय दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नूतन गरोदर होत्या आणि तरीही त्यांनी चित्रीकरण पूर्ण केलं.
 
नूतन यांच्याच काळातील यशस्वी अभिनेत्री मीना कुमारी यांनी 1950च्या दशकात कमाल अमरोही यांच्याशी लग्न केलं. पण त्यानंतरच्या 10-15 वर्षांमध्ये मीना कुमारी यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या.
 
परंतु, यशाच्या शिखरावर असणाऱ्या मीना कुमारी यांचं चित्रपटांमध्ये काम सुरू ठेवणं कमाल अमरोहींना पसंत नव्हतं आणि त्यामुळे दोघांच्या नात्यात बिघाड निर्माण झाला, असंही बोललं जातं.
 
तरीही, विवाहित असल्यामुळे मीना कुमारी यांना कोणतीही भूमिका मिळण्यात अडचण आली नाही. 'कोहिनूर', 'आझाद', साहिब, बीबी और गुलाम', 'आरती', 'दिल अपना और प्रीत पराई' यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट लग्नानंतर आलेले आहेत. १९७२ साली प्रदर्शित झालेला 'पाकिज़ा' हे त्यांच्या कारकीर्दीचं सर्वोच्च शिखर होतं.
 
1970च्या दशकात शर्मिला टागोर यांच्यासारख्या अभिनेत्री आघाडीर होता. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतची शर्मिला यांची जोडी खूप लोकप्रिय होती. त्या दोघांच्या भूमिका असणारा, सप्टेंबर 1969मध्ये प्रदर्शित झालेला 'आराधना' हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर तीन महिन्यांनी शर्मिला यांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं.
 
पण शर्मिला यांनी त्यांचं बरंचसं उत्कृष्ट काम लग्नानंतरच केलं आणि त्या काळच्या सर्वच मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं होतं. 'अमर प्रेम', 'मौसम', 'दाग', 'आविष्कार', 'चुपके चुपके', असे त्यांचे सर्व चित्रपट लग्नानंतरचे आहेत.
 
असित सेन दिग्दर्शित 'सफर' या चित्रपटाचं चित्रीकरण झालं तेव्हा त्या गरोदर होत्या. वास्तविक लग्नानंतर शर्मिला टागोर यांना अधिक यश मिळालं.
 
पत्रकार सुभाष के झा यांना 'फर्स्टपोस्ट'साठी दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या, "बेशर्म या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा सबाचा जन्म होणार होता. काही प्रेक्षकांना विवाहित अभिनेत्री चित्रपटांमध्ये बघणं आवडत नाही, असं लोकांना वाटत असावं. पण प्रेक्षकांना चांगली गोष्ट आणि चांगला चित्रपट पाहायला मिळत असेल, तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत, असं मला वाटतं. एका महिलेने काम करत असताना मुलांना घरात सोडून जाणं तत्कालीन समाजाला रुचत नव्हतं."
 
ग्लॅमरस आणि नकारात्मक भूमिकांसाठी गाजलेल्या बिंदू यांची चित्रपटांमधील कारकीर्द सुरू झाली त्या आधीच त्यांचं लग्न झालं होतं.
 
त्या काळी त्यांचं वय खूप लहान होतं, पण दिग्दर्शक राज खोसला यांनी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटात मुमताजसोबत बिंदू यांना मुख्य भूमिका देऊ केली. हळूहळू त्यांनी 'इत्तेफाक', 'आया सावत झूम के', 'अभिमान', 'कटी पतंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं कॅब्रे नृत्य खूप प्रसिद्ध झालं होतं.
 
याच काळात, 1973मध्ये राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला 'बॉबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. कुमारवयीन मुला-मुलीची प्रेमकहाणी त्यात सांगितली होती. केवळ 16 वर्षांच्या डिंपल कपाडियाने त्यानंतर लगेचच राजेश खन्नाशी लग्न केलं आणि चित्रपटउद्योगाचा निरोप घेतला. परंतु, 1984 साली राजेश खन्ना यांच्याशी काडीमोड घेत डिंपल यांनी चित्रपटविश्वात जोरदार पुनरागमन केलं. 'सागर', 'काश', 'राम लखन', 'रुदाली' यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट या काळातील आहेत.
 
परंतु, 1980च्या दशकापासून एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंतचा काळ काहीसा विचित्र होता. या काळात यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्रींचं लग्न झालं की त्यांच्या कारकीर्दीला ओहोटी लागत असे.
 
याच काळात 'अँग्री यंग मॅन'ची प्रतिमा चित्रपटांमध्ये ठळक होत केली, त्यामुळे नायकापलीकडच्या पात्रांचं महत्त्व कमी झालं. अनेक चित्रपटांमध्ये नायिकांना केवळ प्रेम करण्यापुरतं स्थान मिळालं.
 
नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. करिश्मा आणि करीना कपूर यांच्याआधी कपूर कुटुंबातील स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नव्हत्या. नीतू कपूर आणि बबीता ही याची काही ठळक उदाहरणं होती.
 
ज्येष्ठ पत्रकार भारती दुबे म्हणतात, "मौशमी चॅटर्जींचंच उदाहरण घ्या. त्यांनी लग्नानंतरही चित्रपटांमध्ये कामं केली. पण त्यानंतरच्या काळात मात्र अभिनेत्रींना लग्न केल्यावर करिअर सुरू ठेवणं शक्य नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. चित्रपटांमधील नायिकेबाबत लोकांची काहीएक विशिष्ट कल्पना निर्माण झाली होती. त्या काळी लग्न केल्यावरही अभिनेत्री पाच-दहा वर्षं त्याची जाहीर वाच्यता करत नसत."
 
"निर्माते विवाहित अभिनेत्रींना चित्रपटांमध्ये घ्यायला तयार नसत. २००० सालापर्यंत असंच सुरू होतं. काही अभिनेत्री पुनरागमन करत, परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसे. माधुर दीक्षितनेसुद्धा पुन्हा सुरुवात केली, पण तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही."
 
परंतु, नवीन अभिनेत्रींच्या काळात ही धारणा बदलते आहे.
 
विकी कौशल आणि रणवीर सिंग यांच्यासारखे अभिनेते लग्नानंतरही जोमाने काम करत आहेत, तसंच अनुक्रमे कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांचंही लग्नानंतर काम तितक्याच जोरकसपणे सुरू आहे.
 
प्रियांका चोप्राने तर बॉलिहूडवरून हॉलिवूडला जाऊन यश मिळवलं आणि अशा टप्प्यावर लग्न केलं.
 
बीबीसी मराठीशी बोलताना भारती दुबे म्हणतात, "आता समाज बदलला आहे. लग्नाची जाहीर घोषणा केली जाते. दीपिका पदुकोणच्या 'गहराइयां' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा विचार केला, तर लक्षात येईल की, लग्नानंतरसुद्धा इंटिमेट सीन करणं अभिनेत्रींना सहज शक्य झालेलं आहे. आलियाच्याबाबतीतसुद्धा तिला किंवा तिच्या चाहत्यांना लग्नाविषयी कोणतीही विपरित धारणा त्रासदायक ठरताना दिसत नाही. उलट तिचे चाहते खूश आहेत."
 
यापूर्वी 2012 साली करीना कपूरने लग्न केलं, पण त्यानंतरही तिने चित्रपटांमधील काम सातत्याने सुरू ठेवलं. आई झाल्यानंतरसुद्धा तिचं काम सुरूच राहिलं आहे. आता तिचा भाऊ रणबीर कपूर लग्न करतो आहे, आणि त्याची नववधू आलिया भट्ट यशाच्या शिखरावर आहे.
 
लग्नानंतर करिअरची कोणती वाट चोखाळायची हा सर्वस्वी आलियाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण स्वतःहून चित्रपटांमध्ये काम न करणं आणि लग्नानंतर चित्रपटांमध्ये कामं न मिळणं, यात फरक आहे.
 
'हायवे', 'राझी' आणि 'गंगूबाई' यांसारख्या चित्रपटांमधून आलिया भट्टने पठडीबाहेरच्या भूमिका साकारल्या. त्याचप्रमाणे स्त्रियांना एका साचेबद्ध भूमिकेत कोंबणाऱ्या सामाजिक धारणांची पठडीही लग्नाच्या निमित्ताने ती मोडते आहे.
 
'नॉटिंग हिल' या इंग्रजी चित्रपटातलं एक दृश्य इथे आठवतं. त्यात हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची भूमिका करणारी ज्यूलिया रॉबर्ट्स ह्यू ग्रांटच्या प्रेमात पडते. ग्रांटचं पात्र चित्रपटउद्योगाशी संबंधित नसतं. या नात्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटतं. तेव्हा ज्यूलिया ह्यू ग्रांटला म्हणते, "मीसुद्धा एक मुलगी आहे. एका मुलाने माझ्यावर प्रेम करावं, इतकी साधीशीच माझी अपेक्षा आहे."
 
भारतात कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न होतं तेव्हा आता लग्नानंतर तिच्या करिअरचं काय होईल, याबद्दल चर्चा केल्या जातात. पण अभिनेत्रीच्या रूपात शेवटी एक मुलगीच असते आणि तिला तिच्या खासगी जीवनातील निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यावेसे वाटणं स्वाभाविकच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Alia-Ranbir Wedding: आलिया-रणबीर लग्नासाठी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव