मुंबईत कोरोना आटोक्यात आला आहे. परिणामी रुग्णसंख्यादेखील घटल्याने पालिकेने लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या 18 हजार 477 बेडपैकी 8 हजार 607 तर कोरोना केअर सेंटरमध्ये 6523 बेड रिकामे आहेत. शिवाय क्वारंटाईन केंद्रही रिक्त असून 403 आयसीयू, 4 हजार 145 ऑक्सिजन आणि 190 व्हेंटिलेटर सद्यस्थितीत रिक्त आहेत.
मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोनाने ऑगस्टअखेरीस पुन्हा डोके वर काढले. पालिकेसमोर यामुळे आव्हान निर्माण झाले होते. याचवेळी लॉकडाऊन शिथिल झाल्याने कोरोनाचा धोका वाढला.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नियोजनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम पालिकेने हाती घेतली. 15 सप्टेंबरपासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून घरोघरी जाऊन तपासणी, स्क्रिनिंग आणि सर्वेक्षण, जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेला आता चांगलेच यश येत असून रुग्णसंख्या देखील आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णसंख्या घटल्याने पालिकेने तैनात ठेवलेले निम्मे बेड रिकामे असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ठेवण्यासाठी तयार केलेल्या 335 अलगीकरण केंद्रांपैकी 279 केंद्रे रिक्त असल्याचे ते म्हणाले.