महेंद्र सिंग धोनीच्या बलिदान बॅज बद्दल बीसीसीआयनं त्याचा बचाव केला आणि आयसीसीकडे विनंती केली तरी आयसीसीनं ती विनंती फेटाळून लावली आहे. नियमानुसार आता धोनीला बलिदान बॅज चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरता येणार नाही.
आसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज' ची अधिक चर्चा होत आहे. आयसीसी नियमानुसार आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कोणत्याही खेळाडूला राजकीय, धार्मिक किंवा जातीय संदेश देणारं कृत्य करण्याची मुभा नाही. त्याच नियमानुसार आयसीसीनं धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हावर आक्षेप नोंदवला आहे.
यावर वाद वाढत असलेला बघत आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर वर्ल्डकपमध्ये मी हे ग्लोव्हज वापरणार नाही, असे धोनीने सांगितले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयनंही एक पाऊल मागे घेताना आयसीसीचे आदेश पाळले जातील हे स्पष्ट केले.
नियम हे सांगत असले तरी धोनी चाहत्यांना हा निर्णय काही पटलेला नाही. धोनीचे फॅन्स काय तर माजी खेळाडू गौतम गंभीरनेही धोनीची बाजू घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 जूनला झालेल्या सामन्यात धोनीनं ते ग्लोव्हज घातले होते.