India vs Australia World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पाचवा सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याने दोन्ही संघांच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका खेळाडूच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
कमिन्सला सामन्यापूर्वी आपल्या रणनीतीत महत्त्वाचे बदल करावे लागतील. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल, तर नाणेफेक त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1.30 वाजता होईल
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या अडचणीचा सामना करत आहे. संघाचा सर्वात स्फोटक अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असून भारताविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. अशा स्थितीत कमिन्स स्टोइनिसच्या जागी कॅमेरून ग्रीनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करू शकतो.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लेन मॅक्सवेल भारतीय खेळपट्ट्यांवर खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्याची ऑफस्पिन आतापर्यंत प्रभावी ठरली आहे. चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर मॅक्सवेलची उपस्थिती महत्त्वाची ठरू शकते. तो अॅडम झाम्पासोबत खेळताना दिसणार आहे. कर्णधार कमिन्सशिवाय मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.
भारताकडूनही एका खेळाडूच्या खेळण्यावर शंका आहे. स्टार सलामीवीर शुभमन गिल आजारी असून मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला डेंग्यू झाला आहे. त्याच्या खेळावर साशंकता कायम आहे. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपल्या पत्रकार परिषदेत शुबमनच्या खेळण्याबाबतचा निर्णय नाणेफेकीपूर्वी घेतला जाईल, असे सांगितले होते, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन अद्याप यातून सावरलेला नाही.
शुभमन खेळला नाही तर रोहितसह ईशान किशनला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत संधी मिळू शकते. श्रेयस चांगली फिरकी खेळतो, त्यामुळे त्याला सूर्यापेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते.
भारताचे संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य खेळाडू- 11
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.