भारतामध्ये बुद्धीच्याही पलीकडे जाऊन विचार करून, काही धार्मिक व्रत-वैकल्याची रचना केली गेली असावी. अशा गोष्टी घडू शकतात का? असं म्हणणार्यांनी देखील या वरती विश्वास ठेवून या गोष्टी सत्य मानल्या आहेत. कारण श्रद्धेने काहीही घडू शकते, असा दाखला देणारा इतिहास या भारत भूमीमध्ये वेळोवेळी घडलेला आहे आणि घडतही आहे. त्यामुळे विज्ञानालाही झुकविणारा आणि श्रद्धेच्या जोरावर कठीण प्रसंगांना सामोरे जाणारा विवेक या भूमीमध्ये अनेक हजारो वर्षांपासून रुजला आहे. त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे.
संस्कार हाच आपल्याला घडवत असतो आणि आपले मार्ग सुखकर करत असतो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारांना अधिक महत्त्व दिले आहे. आपले आयुष्यदेखील संस्कारांनी फुलवले तर आपण देखील सर्वांसाठी वटवृक्ष होऊ शकतो. असे दाखविणारा संस्कार भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहे. विज्ञानापलीकडे जगामध्ये काहीतरी आहे, असे नेहमी आपल्याला धार्मिक कथांमधून वाचायला मिळते.
विज्ञानाने अनेक क्षेत्रात प्रगती केली, परंतु त्या विज्ञानाला अजूनही मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही. तो चमत्कार भारतातील एका मुलीने आपल्या प्रेम शक्तीने करून दाखवलेला होता. भद्र देशाचा राजा अश्वपती याने पुत्रप्राप्तीसाठी अठरा वर्षं गायत्री उपासना केली, तेव्हा त्याला देवीच्या कृपेने सावित्री ही कन्या झाली. सावित्री वयात आल्यावर तिला तिच्या मनासारखा पती शोधण्याचे अश्वपतीने स्वातंत्र्य दिले. जीवनसाथी निवडताना मुलीने व जावई शोधताना मुलीच्या माता-पित्यांनी समंजसपणा व बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे. आमचा जावई श्रीमंत व तोलामोलाचा असला पाहिजे, हा दुराग्रह नसावा. पैशाशिवाय व्यवहार चालणे निश्चित कठीण असते, परंतु पैसा जोपर्यंत साधन म्हणून वापरला जातो तोपर्यंत संसारात सुख व समाधान मिळत असते. परंतु तोच पैसा साध्य झाला की त्यातून अनर्थ घडतो. हे आपण वेळोवेळी घडणार्याच घटना आपल्या आजूबाजूला घडत असताना पाहातच असतो. आर्थिक परिस्थितीने गरीब असला तरी प्रेमळ पती असावा. कारण, त्याच्याजवळ असलेल्या प्रेमाच्या श्रीमंतीने त्या मुलीचे संसार, जीवन स्वर्गा सारखे सुखी होते. अश्वपतीने प्रधान सेनापती सावित्री बरोबर देऊन तिला पती शोधाण्यासाठी पाठविले. वाटेत एका अरण्यातील सृष्टीसौंर्दय पाहताना तिच्यावर वाघाने हल्ला केला, तेव्हा एका तरुणाने त्या वाघास ठार मारले. त्याचे शौर्य पाहून सावित्री प्रभावित झाली व तिने त्याचा परिचय विचारला. तेव्हा तो म्हणाला, हे राजकुमारी मी पदच्युत शाल्वनरेश द्युमत्सेन यांचा सत्यवान नावाचा मुलगा असून माझ्या अंध माता-पित्यांना या जंगलात एका झोपडीत घेऊन राहात आहे. मी राजकुमार जरी असलो तरी सत्ता नसल्यामुळे दरिद्री आहे आणि जंगलातील लाकडे तोडून मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहे. त्या तरुणाच्या शौर्याने प्रभावित होऊन सावित्री सत्यवानाची जीवनसाथी म्हणून निवड करते व निवडलेल्या तरुणाची माहिती पिता अश्वपती व भेटावास आलेल्या ब्रह्मर्षी नारदांना सांगते.
हे ऐकून नारद म्हणतात, तू निवडलेला तरुण सर्वांगीण चांगला असला तरी अल्पायुषी असून एका वर्षाने मृत्यू पावणार आहे. तेव्हा निर्धार असलेली सावित्री मुनींना उत्तर देते.
दीर्घायु अथवा अल्पायु सगुणो निर्गुणोपिवा।
सकृद् वृत्तो मया भर्ता न द्वितयम वृणोम्य हम॥
मनसा निश्चयम् कृत्वा ततोवाचाभिदिते ।
क्रियते कर्मणा पश्च्यात् प्रमाणम् ते ते मनस्ततः ॥
मी निवडलेल्या तरुणाशी विवाह करेन, असा निर्धार व्यक्त करून ती सत्यवानाशी विवाह करते. राज्यवैभवाचा त्याग करून सत्वानाबरोबर सासूसासर्यांची सेवा करत पर्णकुटीमध्ये राहते. सत्यवान सावित्रीचा संसार समाधानाने चालला होता. नारदांच्या भविष्वाणीप्रमाणे पतीचा मृत्यू जवळ आला आहे, याची सावित्रीला जाणीव होते. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला नित्यप्रमाणे सत्यवान लाकडे तोडण्यासाठी निघाला तेव्हा सावित्रीही त्याबरोबर गेली. एका वटवृक्षावरची लाकडे तोडताना सत्यवान पाय घसरून खाली पडला व त्याचा प्राण गेला. सत्यवानाचे प्राण यमधर्म घेऊन जात असताना सावित्री त्यांच्या मागे निघाली. जाताना तिने पतीचे प्रेत वटवृक्षाच्या खोडात ठेवले व मी येईपर्यंत आपण माझ्या पतीच्या शवाचे रक्षण करावे, असे त्या वटवृक्षाला सांगितले. सावित्री यमाच्या मागे निघाली. बरेच अंतर गेल्यावर यमाने मागे पाहून सावित्रीला सांगितले, हे मुली तू माझ्या मागे येऊ नकोस. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीस मृत्यू हा येतोच. तुझ्या पतीचे आयुष्य संपले म्हणून त्याचा प्राण मी घेऊन जात आहे. तेव्हा सावित्री मधूर शब्दात म्हणाली, हे पिताजी, आयुष्य संपलेल्या प्राण्याचा प्राण बरोबर घेऊन जाणे हा जसा आपला धर्म आहे. तसा जिथे पती तिथे सती हा स्त्रिांचा धर्म मी पाळत आहे. आपण माझ्या पतीला घेऊन जात आहात, त्यामुळे त्यांच्याबरोबर येणे हा माझा अधिकार व धर्म आहे. सावित्रीचे उत्तर ऐकून यमराज प्रसन्न झाले व म्हणाले, मुली सत्यवानाचे प्राण सोडून तू तीन वर मागून घे. तेव्हा सावित्रीने हुशारीने तीन वर मागितले. माझ्या सासू-सासर्यांलचे अंधत्व जाऊन त्यांचे राज्य त्यांना परत मिळून माझ्या पित्याला मुलगा व्हावा व मला शंभर मुले होवोत. बोलण्याच्या ओघात धर्मराज तथास्तु म्हणाले. तेव्हा सावित्री विनयाने म्हणाली, भगवंत् आपण माझे सासर- माहेर संपन्न केले. त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देते. परंतु मला शंभर मुले होण्याचे वरदान पतीशिवाय सफल होणे शक्य नाही. धर्मराज सावित्रीची पतीनिष्ठा पाहून प्रसन्न झाले व त्यांनी शंभर मुले होईपर्यंत तुझा पती तुझ्याजवळ राहील, असा वर दिला. सत्यवान जिवंत झाला. ही कथा बारा ज्योतिर्लिंगातील परळी-वैद्यनाथ याच परिसरात घडली आहे.
राज्यसत्तेमुळे त्यांचा संसार आनंदाने संपन्न झाला. वटवृक्षाने सत्यवानाचे प्रेत सांभाळले. त्या स्मृतिप्रीत्यर्थ आजही स्त्रीवर्ग वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे श्रद्धेने पूजन करतात. वटसावित्री व्रत ज्येष्ठ शुद्ध 13 ते 15 असे तीन दिवस करतात. या पूजेमागे सूक्ष्म भावना लपलेली आहे. आपल्या पतीवरच्या प्रेमामुळे अपमृत्यूही कळू शकतो किंवा आपले प्रेम हे मृत्यू टाळू शकते हे दर्शविणारा हा प्रसंग आहे.
भारतीय स्त्रियांचे आपल्या पतीवरचे प्रेम हे अलौकिक असते. या तिथीला आपल्या पतीच्या जीवाचे व आपल्या कुटुंबाचे या महामारीपासून रक्षण करण्यासाठी आपण या वटवृक्षाची घरीच राहून पूजा करू शकतो. आपली मानसिक ताकत वाढविण्यासाठी या वटसावित्रीची पूजा प्रत्येक महिलेने केलीच पाहिजे. आपल्या मनाची तीव्र इच्छाशक्ती वाढवण्याचे काम ही व्रतवैकल्ये करत असतात. त्यामुळे आपण आपली शारीरिक, मानसिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच वडाच्या प्रत्येक प्रतीकात्मक वस्तूंची घरीच पूजा करून हा सण उत्तम रित्या साजरा करू शकतो.