Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनं करणाऱ्या 21 काश्मिरी तरुणांना अटक

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनं करणाऱ्या 21 काश्मिरी तरुणांना अटक
, सोमवार, 17 मे 2021 (16:08 IST)
आमीर पीरझादा
पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ निदर्शन करणाऱ्या 21 जणांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे.
 
काश्मीरचे इन्स्पेक्टर जनरल विजय कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, "काश्मीरमधून 21 जणांना अटक केली आहे. यात एका कलाकाराचा समावेश आहे. ते पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ भित्तीचित्र बनवतात."
 
27 वर्षांच्या मुदासिर गुल यांना शुक्रवारी श्रीनगरहून अटक करण्यात आली. त्यांना भित्तीचित्र काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या भित्तीचित्रात लिहिलं होतं की, आम्ही सगळे पॅलेस्टिनी आहोत.
 
मुदासिर यांचे भाऊ बदरूल इस्लाम यांनी म्हटलं, "पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्या पुलावर चढायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्या भित्तीचित्रांना काळी शाई फासली.
 
"खरं तर त्याला एक दिवस आधीच अटक करण्यात आली होती. असं असतानाही कुटुंबीयांना त्यांच्यावरील आरोपांविषयी काही सांगण्यात आलं नव्हतं."
शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध करत त्यात म्हटलं आहे की, काश्मीरच्या रस्त्यावर हिंसा, अराजकता आणि अव्यवस्था भडकावण्याची कुणालाही परवानगी नाही.
 
निवेदनात म्हटलंय, "काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि व्यवस्था बिघडवण्यासाठी जे लोक पॅलेस्टिनींच्या दुर्भाग्यपूर्ण स्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लोकांवर जम्मू-काश्मीर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही एक प्रोफेशनल फोर्स आहोत, ज्यांना जनतेचं दु:ख समजतं."
 
शनिवारीच 22 वर्षांच्या मोहम्मद इरफान यांना अटक करण्यात आली.
मोहम्मद इरफान यांना त्यांच्या कुटुंबानेच पोलिसांच्या स्वाधीन केलं. मोहम्मद इरफान यांच्या 17 वर्षांच्या छोट्या भावाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या सुटकेच्या बदल्यात मोहम्मद इरफान यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.
 
मोहम्मद इरफान यांची आई गुलशन सांगतात, "रात्री जवळपास 1 वाजता सशस्त्र दलानं दरवाजा वाजवला आणि ते आत आले. ते माझ्या मुलाला इरफानला शोधत होते. त्यांना इरफान सापडला नाही म्हणून ते माझ्या छोट्या मुलाला घेऊन गेले. उद्या इरफानला पोलीस स्टेशनला घेऊन या तरच तुमच्या लहान मुलाची सुहैलची सुटका करू, असं ते म्हणाले."
 
इरफान यांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात सहभाग घेतला होता.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढल्यानंतर या आठवड्यात काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ निदर्शनं झाली आहेत.
 
गुलशन सांगतात, "ही निदर्शनं काश्मीरच्या बाबतीत नव्हती. ते तर पॅलेस्टिनींसाठी होतं. यात चुकीचं काय आहे?"
 
"त्यांनी माझ्या मुलाला अटक केली आहे आणि ते त्याला कधी सोडतील याबाबत आम्हाला काहीच माहिती नाहीये," गुलशन पुढे सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने केल असे काही ! पण अखेर गुन्हा दाखल…