Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लिबिया : चक्रीवादळ आणि धरणफुटी एकाचवेळी, हजारोंचा मृत्यू, 10,000 पेक्षा जास्त लोक बेपत्ता

लिबिया : चक्रीवादळ आणि धरणफुटी एकाचवेळी, हजारोंचा मृत्यू, 10,000 पेक्षा जास्त लोक बेपत्ता
, मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (21:39 IST)
लिबिया मध्ये सध्या पुराने हाहाकार माजवला आहे. डर्ना या शहरात मृतांचा आकडा 1500 च्या वर गेल्याचं एका मंत्र्याने सांगितलं. या मंत्र्यांनी या भागाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बीबीसीला ही माहिती दिली.
“मी जे पाहिलं त्यामुळे मला धक्का बसला. ही तर त्सुनामीसारखी परिस्थिती आहे,” हिशम चिक्वॉट यांनी ही माहिती दिली.
 
डर्ना येथे लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे. दोन धरणं फुटल्याने आणि चार पूल कोसळल्याने हे शहर पाण्याखाली गेलं आहे.
 
डॅनिअल वादळामुळे 10 हजारापेक्षा जास्त लोक बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
रविवारी हे वादळ आलं. बेनघाझी, सुझा आणि अल-मर्ज या पूर्वेकडील शहरांनासुद्धा या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
 
डर्ना येथील दक्षिण भागातील एक धरण फुटल्याने शहरातला बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे अशी माहिती चिक्वॉट यांनी बीबीसी न्यूजअवरला दिली आहे.
 
“बराचसा भाग उद्धवस्त झाला आहे. पीडितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ती दर तासाला वाढत आहे. सध्या 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2000 लोक बेपत्ता आहेत. आमच्याकडे एकदम ठोस आकडा नाही पण हे खूप मोठं संकट आहे.” ते म्हणाले. या धरणाची बऱ्याच काळापासून देखभाल झाली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
तत्पूर्वी या शहराचा एक चतुर्थांश भाग दिसेनासा झाल्याची माहिती त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.
 
तामेर रामदान हे International Federation of Red Cross and Red Crescent Socities (IFRC) चे अध्यक्ष आहेत. मृतांचा आकडा प्रचंड असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
ट्युनिशिया येथून व्हीडिओ लिंकवरून बोलताना ते म्हणाले, “आमच्या टीम्स प्रत्यक्ष परिस्थितीचं अवलोकन करत आहेत. आत्ता आमच्याकडे ठोस आकडा नाही. आतापर्यंत 10 हजार लोक बेपत्ता आहेत.”
 
पूर्वेसारखंच मिश्राता या पश्चिमेकडील शहराला देखील या पुराचा फटका बसला आहे.
 
लिबियामध्ये 2011 मध्ये गदाफी यांची सत्ता उलथवल्यावर आणि हत्या करण्यात आल्यानंतर राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे तिथे सरकारचं विभाजन झालं आहे.
 
एक अंतरिम सरकार, एक राजधानीतलं सरकार आणि एक पूर्वेकडलं सरकार अशी तीन सरकारं तिथे आहेत.
 
तिथल्या स्थानिक पत्रकारांच्या मते या परिस्थितीमुळे तिथे बचावकार्याला अतिशय अडचणी येत आहेत.
 
“तिथे कोणतीही बचावपथकं नाहीत. कोणीही प्रशिक्षित व्यक्ती नाहीत. गेल्या 12 वर्षांपासून तिथे फक्त युद्धजन्य परिस्थिती आहे,” त्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
“लिबियामध्ये दोन सरकारं आहेत. त्यामुळे तिथे येणाऱ्या मदतीचा वेग कमी झाला आहे. लोक मदतीसाठी याचना करत आहेत पण मदत येत नाहीये.”
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परतीचा पाऊस आणि मागील एफआरपीचा तिढा यामुळे गळीत हंगाम लांबणार