इंडियानामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 6 महिन्यांच्या बाळाला उंदरांच्या टोळीने जिवंत चावले. मुल त्याच्या पाळण्यात आरामात झोपले होते. त्यानंतर उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. असे सांगितले जात आहे की उंदरांनी मुलाचा 50 पेक्षा जास्त वेळा चावा घेतला आणि इतकेच नव्हे तर त्याचे शरीर देखील कुर्तडले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने पालकांना ही घटना कळली.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार ही घटना बुधवारी घडली. जेव्हा मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबॉम आपल्या मुलाला भेटायला गेले तेव्हा ते चक्रावून गेले. त्यांच्या मुलाला सतत रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठून दोन्ही पालकांना ताब्यात घेतले. मुलाची योग्य काळजी न घेतल्याचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांवर केला जात आहे. या घटनेतील आरोपींमध्ये आई-वडिलांशिवाय मुलाची मावशी डेलानिया थुरमन हिचेही नाव आहे. याच घरात राहणाऱ्या डेलानियालाही पोलिसांनी अटक केली आहे.
मुलाच्या शरीरातून रक्त वाहत होते
रिपोर्टनुसार, मुलाच्या गाल, नाक, कपाळ, पाय, हात, मांड्या, हात आणि पायाची बोटे यावर उंदीर चावल्याच्या अनेक खुणा होत्या, त्यातून खूप रक्त वाहत होते. पोलिसांनी सांगितले की, उंदरांनी मुलाचा उजवा हात कोपरापर्यंत चावला होता. त्याच्या बोटांच्या काही भागालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे हाडे बाहेर आली होती. या घटनेनंतर, मुलाला ताबडतोब इंडियानापोलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला रक्त दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब ज्या घरात राहत होते त्या घरात अस्वच्छता होती. संपूर्ण घर कचरा आणि उंदरांनी भरलेले होते. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मार्चमध्ये उंदरांमुळे हा त्रास सुरू झाला. या पूर्वी देखील उंदरांनी मुलांचा चावा घेतला आहे.