Nigeria news : नाइजीरियाच्या जम्फारा राज्यामध्ये रविवारी नायजेरियन सैन्याकडून चुकून झालेल्या हवाई हल्ल्यात सोळा नागरिक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. हा लष्करी हल्ला झुर्मी आणि माराडुन भागात झाला, जिथे स्थानिक लोकांना डाकूंची टोळी समजण्यात आले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जम्फारा राज्यात कार्यरत असलेल्या दरोडेखोर टोळ्यांविरुद्ध लष्कर बऱ्याच काळापासून कारवाई करत आहे. या टोळ्या गावांवर हल्ला करतात आणि लुटमार, जाळपोळ आणि लोकांचे अपहरण यासारख्या घटना घडवतात. शनिवारी डांगबे गावावरही दरोडेखोरांनी हल्ला केला आणि जनावरे लुटली. दरोडेखोरांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेले स्थानिक लोक स्वतःचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे घेऊन दरोडेखोरांशी लढत आहे. रविवारी, झुर्मी आणि मराडुनमध्ये काही लोक दरोडेखोरांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करत असताना, लष्कराच्या वैमानिकाने त्यांना दरोडेखोर समजून हवाई हल्ला केला. तसेच नायजेरियन हवाई दलाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Edited By- Dhanashri Naik