राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणं करत आहेत हे आता वेगळं सांगायची गरज नाही असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे यांनी म्हटलं की, ‘शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या. पण या जाहीर सभांमधील भाषा मात्र एकच आहे. मोदी सरकार, भाजपची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे हे शरद पवार पण बोलले आणि राज ठाकरे पण नेमके तेच बोलले. तसेच नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावावर मतं मागतात हेच वाक्य शरद पवारही बोलले आणि राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात हाच उल्लेख केला. त्यामुळे जनतेलाही आता कळले असेल की, राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार कसे काम करीत आहेत असं विनोद तावडे यांनी सांगितलं.