Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Makar Sankranti Specialयेवल्यातील पतंगोत्सव

makar sankrant kite
, शनिवार, 14 जानेवारी 2023 (17:30 IST)
'फडकीचा घाट, डट्टा, अंग, गोंडं, मत्स्य, डोळे, कल्लेदार, आसारी....' काही तरी विचित्र वाचतोय, असं वाटतयं ना! पण तुम्ही वाचताय हे शब्द मराठीच आहेत. ते इतरात्र बोलले जात नसले, तरी नाशिकजवळच्या येवल्यात मात्र सराईतपणे बोलले जातात. अर्थात येवल्याची भाषा तुमच्या-माझ्यासारखीच मराठी असली, तरी 'या बाबतीत' ती थोडी वेगळीच आहे. ही भाषा आहे पतंगासंदर्भातली. पतंग इतरत्रही उडविले जात असले, तरी येवल्याची परंपरा काही खाच आहे. ती तेथे गेल्यावरच कळू शकेल आणि या शब्दांचा अर्थही कळेल. दरवर्षीच्या मकरसंक्रांतीबरोबरच येवल्यात पतंगोत्सव साजरा होत असतो. या दोन दिवसांत संपूर्ण येवला जमिनीवर नसतंच, (लाक्षणिक अर्थानं) ते असतं धाब्यांवर. अर्थात घराच्या गच्च्यांवर, कौलांवर, पत्र्यांवर. गावातले व्यवहारही अपवाद वगळता बंद असतात. जणू अघोषित बंदच असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपलं वय विसरून सारे जण पतंग उडविण्यात मग्न असतात. वेळेचं, भुकेचं भान कोणालाही उरलेलं नसतं. ढोलताशा, हलकडीच्या तालावर आणि लाऊड स्पीकरच्या ठणाणत्या आवाजात धुंद होऊन येवलेकर पतंग खेळत असतात. 'य~~~~काटे'च्या आवाजाने आणि दुसर्‍याच्या काटलेल्या पतंगाच्या आनंदाने त्यांचं मन पतंगाप्रमाणे वर गिरक्या घेत असतं.
 
येवलेकरांचं पतंगाचं हे वेड तसं फार जुनं आहे. त्याची परंपरा सांगताना व्यंगचित्रकार व येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर झळके म्हणाले, की पतंगोत्सवाच्या जन्मकथेनं येवल्याच्या जन्माबरोबरच आकार घेण्यास सुरवात केली. जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी रघुजीबाबा पाटील या सरदारांनी हे गाव वसवलं. गावाच्या विकासासाठी त्यांना विविध व्यवसायांनाही उत्तेजन दिले. विणकरांनाही त्यांनी इथं बोलावून आणलं. त्यांनतर गुजराती समाजालाही इथं आणलं. गुजरातमध्ये पतंगांना मोठे महत्त्व नि परंपराही आहे. या कुटुंबांनी येवल्यात येताना आपला पारंपरिक पतंगोत्सवही आणला नसता तरच नवल! त्यामुळे गुजरातच्या मातीत फुललेला पतंगोत्सव इथंही बहरला. या उत्सवात स्थानिकांनीही तितकाच उत्साहजनक सहभाग घेतल्यानं तो अधिकाधिक लोकप्रिय झाला. त्याची लोकप्रियता पतंगाप्रमाणेच आभाळापर्यंत जाऊव पोहोचली. त्यामुळेच 'येवल्यातील मुलांना पतंग उडवायला शिकवावं लागत नाही,' असे म्हटले जाते ते खोटे नाही. 
 
येथील पतंगोत्वसाची काही वैशिष्टंही आहते. ती पतंगात, मांजात, आसारीत आणि ती उडविण्यातही आहेत. पतंग तयार करण्याची त्यांची धाटणीदेखील 'हटके' आहे. येवल्यात पतंग घ्यायचा तर आधींचा, पावणाचा, सव्वाचा किती 'फडकी'चा घ्यायचा. ते सांगावे लागते आता हे फडकी काय प्रकरण आहे. ते चटकन कळणार नाही. फडकी म्हणजे पतंग तयार करण्याचा कागद. अर्धी फडकी म्हणजे सर्वांत लहान पतंग तयार करण्यासाठी लागणार्‍या कागदाचं प्रमाण. या फडकीचं प्रमाण वाढवाल तसा त्याचा आकार वाढत जातो. डट्टा म्हणजे पतंगाच्या मध्ये वापरण्यात येणारी काडी. कमान म्हणजे पतंगाच्या मध्ये वाकवलेली काडी. हे सगळं खळीच्या सहाय्यानं पतंगाला चिकटवायचं. त्याला काळी शेपटी लावतात. त्याला गोंडा म्हणतात. पतंगाच्या डट्ट्याच्या दोन्ही बाजूंना दोन ठिपके काढले, की ते डोळे होतात. त्याची शेपटी माशासारखी केली, की तिला म्हणतात 'मत्स्य'. पतंगासाठी साध्या कागदाप्रमाणे बेगडीचाही वापर करतात. याशिवाय तो सजविण्यासाठी रंगांचा किंवा चमकीचाही वापर केला जातो.
 
इथले पतंग परिसरात प्रसिद्ध आहेत. धोबी पतंग तर इथली खास ओळख. इथं तयार होणारे पतंग आजूबाजूच्या गावांत तर जातातच, पण गुजरातमध्येही पाठिवले जातात. आपलं नाव, मंडळाचं, पक्षाचं नाव असलेले पतंगही इथं बनविले जातात. या शिवाय काही वेगळे प्रयोगही केले जातात. त्या गेल्या वर्षी एका मंडळानं अठरा फुटी पतंग केला होता. तर काहींनी पतंगात पेटता दिवा ठेवून तो आकाशात उडवला होता. पतंगाबरोबर महत्त्वाचा असतो तो मांजा. काटाकाटीच्या खेळात आपला मांजा काटू नये, यासाठी तो मजबूत करण्यासाठी वाट्टेल तो प्रकार केले जातात. जाड बाटलीच्या काचा कुटून वस्त्रातून गाळल्या जातात. मग रांगोळीसारखी भुकटी खाली राहते. ही भुगटी कुणी दोनशे रुपये किलोनं मागितली तरी दिली जात नाही, असं देवेंद्र वसईकर नावाच्या पतंगविक्रेत्यानं सांगितलं यांचा कारण काय, ते कुटण्यासाठी केलेली मेहनतच एवढी असते, की त्याच मोल नसतं! या किचकट प्रक्रियेनंतर सरस भिजवून गरम केला जातो. त्यात भात, अंडी असे काहीही पदार्थ टाकले जातात. उद्देश एकच, मांजा मजबूत व्हायला हवा. त्यानंतर या दोन्ही पदार्थांतून दोरा काढला जातो. सरस व काचांची पूड चिकटल्याने मांजा सहसा तुटत नाही. पतंग व मांजा तयार करण्याचे 'कुटीरोद्योग' संध्या येवल्यात घराघरात सुरू आहेत.
 
पतंग आणि मांजा तयार केला, तरी तो उडविण्यासाठी आसारी हवीच. आसारी ही खास येवल्याची ओळख आहे. इतरत्र पतंग उडविताना दोर्‍याचा गुंडा धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अशी दोन माणसं लागतात. येवल्यात आसारी असल्यानं एकच माणूस हे काम करू शकतो. मुळात आसारी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. येवला हे विणकरांचे गाव आहे. पैठणीच्या विणकामात रेशमाचा गुंडा सो‍डविण्यासाठी आसारीचा उपयोग केला जातो. तिला एक मोठा दांडा असतो. तो‍ फिरवून सोडविलेली रेशीम व्यवस्थितरीत्या गुंडाळली जाते. याच आसारीचा उपयोग पतंग उडविताना मांजा गुंडाळण्यासाठी होऊ शकतो, असा शोध लागला आणि येवल्याचं वैशिष्ट्यही जन्माला आलं. आसारी असेल तर मांजा कमी लागतो, तो गुंडाळता सहज येतो आणि मुख्य म्हणजे त्याच्या सहाय्यानं पतंगाला दिशा देणंही सोपं जातं.
 
विणकरांची संख्या जास्त असल्यानं इथं आसार्‍यांना तोटा नाही. शिवाय बुरुड सामाजाची वस्ती असल्याने आसार्‍याही मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्याची माहिती देताना या समाजातील शिक्षक चांगदेव खैरे म्हणाले, की आसारी बनविण्यासाठी लागणार बांबू सिंधुदुर्ग, कुडाळ परिसरातून येतो. विदर्भातील बांबू त्यासाठी योग्य नाही. करवत, कोयला आणि किकरं याच्या सहाय्यानं आसारी बनविता येते. हे बांबू योग्य त्या प्रकारात कापून घेतले जातात. त्यानंतर त्यांना छिद्र पाडली जातात. त्यांना चांगला बाक येण्यासाठी छिलण्यात येते. मुख्य दांडा गुळगुळीत बनविण्यात येतो. एका बांबूत साधारणत: तीन मोठ्या, तर चार किंवा सहा छोट्या आसार्‍या होतात. आसारीतही सहा, आठ, बारा पाती असे प्रकार असतात. पंधरा ते पन्नास रूपयांपर्यंत त्यांच्या किमती असतात. आसार्‍या बनविण्याचा येथील व्यवसाय तसा खूप मोठा आहे. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी पतंगोत्सवासाठी आसार्‍या बनविण्यास येथे सुरवात होते. येथे तयार झालेल्या आसार्‍या नगर, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर येते पाठविण्यात येतात. येवल्यातल्या पंतगोत्सवाचं वेड एवढे आहे, की या गावातून विस्थापित झालेले लोकही मकरसंक्रांतीच्या काळात जातात. व्यापारीही दुकानं बंद ठेवून वर्षभराचा ताण सैल करतात. मुलांचा तर या काळात जल्लोषच असतो. पतंगोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तर रात्रीही पतंग उडविले जातात आणि याच जल्लोषात पतंगोत्सवाला निरोप दिला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळ देव मंदिरात असे काय आहे की लाखो भाविकांची गर्दी जमते?