वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील तीन खेळाडू आणि अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधित झालेल्या तीन खेळाडूंची नावेही समोर आली आहेत. सलामीवीर फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांचा संसर्ग झालेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे.
तीन खेळाडूंव्यतिरिक्त काही सपोर्ट स्टाफलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन ते चार असू शकते. अहमदाबादला पोहोचताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तसेच आणखी अनेक खेळाडूंना संसर्ग होऊ शकतो. सध्या टीम इंडियाचे सर्व सदस्य आयसोलेट झाले आहेत.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, काही कर्मचारी आणि खेळाडूंना संसर्ग झाल्याचेही आमच्या निदर्शनास आले आहे. बोर्ड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.भारतीय संघातील सहा ते सात सदस्यांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.आणि बोर्ड लवकरच संक्रमित खेळाडूंच्या बदलीची घोषणा करू शकते. अष्टपैलू शाहरुख खान, ऋषी धवन आणि लेगस्पिनर साई किशोर यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते.