वेटर, सर्जन, रिसेप्शनिस्ट, घरगडी, बँकिंग माहिती देणारे अशा विविध भूमिका अत्यंत अचूकपणे बजावणारे रोबो जगात रुळले असताना रोबोवरील संशोधनही अधिक प्रमाणात वाढले आहे. यातूनच न्यूझीलंडच्या संशोधकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी नेतेगिरी करणारा रोबो तयार केला आहे.
एखाद्या राजकीय नेत्याची सर्व वैशिष्ट्ये असलेला हा रोबो 2020 मध्ये होत असलेल्या निवडणुकात उमेदवार म्हणून उभा केला जाणार असल्याचे समजते. सॅम नावाचा हा रोबो कृत्रिम बुद्धिमत्तेवर एखाद्या कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे काम करेल.
निवास, शिक्षण, व्हिसा, इमिग्रेशन या व अशा स्वरुपाच्या अनेक कळीच्या मुद्यांवर विचारलेल्या प्रश्नांची हा रोबो योग्य उत्तरे देईच पण स्थानिक प्रश्नांवरचीही उत्तरे तो देईल. 49 वर्षीय उद्योजक निक गेरिटसन सांगतात, रोबो ही माणसे नसली तरी तंत्रज्ञशनाच्या मदतीने ते माणसासारखीच वर्तणूक करु शकतात. जगातील या प्रकारचा हा पहिलाच रोबो आहे. राजकारणाविषयी सामान्य माणसाच्या मनात अनेक पूर्वग्रह आहेत. ते या रोबोमुळे थोडेफार दूर होण्यास मदत मिळेल अशी आशा आहे.