सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये हातून काही अक्षम्य चुका घडतात आणि त्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. वाढत्या जाडीबरोबरच सुटलेलं पोट हे देखील याच चुकांची परिणती असते. वाढलेलं पोट व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करतंच त्याचप्रमाणे आरोग्यावरही याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. वाढलेलं पोट हे अनेक समस्यांचं कारण ठरतं. म्हणूनच बेली फॅटची वेळीच दखल घ्यायला हवी.
बेली फॅटमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. आरोग्य जीवनशैलीमुळे पोटाच्या आजूबाजूला फॅय्स जमा होऊ लागतात आणि शरीरात सायटोकिन नामक रसायनाची मात्रा वाढते. हे रसायन इन्सुलिन आणि रक्तदाबावर विपरित परिणाम करतं. त्याचप्रमाणे हृदयावर याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.
बेली फॅटमुळे डायबेटिसचा धोका वाढतो. इन्सुलिनशीसंबंधी समस्या उत्पन्न होत असल्यामुळे रक्तातील शर्करेचं प्रमाण असंतुलित होतं आणि टाईप 2 प्रकारच्या मधुमेहाचा धोका वाढतो.
पोट मोठं असेल तर निद्रेसंबंधी काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हे लोक झोपेत खूप घोरतात. यामुळेदेखील धोका उद्भवू शकतो. काहींना निद्रानाशाचा त्रास संभवतो.
पोटाजवळील फॅट्स वाढल्यामुळे पेशींवर दबाव येतो. मोठ्या पोटामुळे पाठीच्या स्नायूंवरही अकारण ताण वाढतो. परिणामी सततची पाठदुखी मागे लागते.