Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit pawar
, सोमवार, 25 एप्रिल 2022 (08:48 IST)
वांद्रे येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नरेंद्र दराडे, मोहम्मद इस्माईल अ. खा., माजी आमदार अनिल कदम, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी. डी. देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुरुवातीच्या काळात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वसतिगृहे निर्माण केली व शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात आणून त्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करणे, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी पाठविण्यासाठी मदत करणे हा विचार त्याकाळात शाहू महाराजांनी केला. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोलाचे आहे. आजच्या काळात शिक्षणाचे चित्र बदलले असून शिक्षणाची साधने  सुद्धा अधिक प्रगत झाली आहेत. आपल्या संविधानाने आपल्याला सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली आहे. देशात वेगवेगळ्या जाती, धर्म व पंथ जरी असले तरी सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण आपणास शिवाजी महाराजांनी दिली व त्याच मार्गाने फुले, शाहू व आंबेडकर यांनी  सर्वांना पुढे नेले व आजही सर्वांना त्याशिवाय तरणोपाय नाही.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे. उच्च शिक्षणाची कास धरून आपले भवितव्य, पालकांचे व देशांचे नाव उज्ज्वल करावे. आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेवून एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी, असेही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
 
एकत्रित शिक्षणाने एकोप्याची भावना दृढ होणार : पालकमंत्री छगन भुजबळ
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ आपल्या मनोगतात म्हणाले, आज मातोश्री मुलीच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून, या वसतिगृहात महाज्योती, सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थींनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. व एकत्रित शिक्षणाने सर्वांमध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे.
 
लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच  प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे. सर्व मुला-मुलींनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील राहून, डॉक्टर, इंजिनियर्स, आय. टी. क्षेत्रात प्राविण्य मिळविले पाहिजे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिकून देशाचे नाव उज्ज्वल करा असा संदेश यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
 
भविष्यात वसतिगृहांच्या निर्मितीची चळवळ महाराष्ट्रभर राबविणार : मंत्री उदय सामंत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी 2 वसतिगृहे सुरू  करणार आहोत. व भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत. मातोश्री मुलींच्या वसतिगृहात 200 विद्यार्थी क्षमता असून यात 75  विद्यार्थी सारथी संस्थेकडून 75  विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून व 50 विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज, एच पी टी कॉलेज, के.टी.एच. कॉलेज,  स्कॉऊट, एन.सी.सी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! जावयाने केली सासऱ्याची हत्या