अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांचे निलंबन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रद्द केले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणत्याही अधिकाराचा वापर करुन रद्द केले नाही असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या स्तरावरच पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले असून पदस्थापना देण्यात आली असल्याचे राजभवनाने सांगितले आहे.
महाराष्ट्र राजभवनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द आणि पदस्थापनाबाबत जी चुकीची माहिती प्रसारित होत होती. त्याचा खुलासा करण्यात आला आहे. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः निराधार व कल्पित असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे