प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणार्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांचा यात समावेश आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती. आकाशने नदीत बुडणार्या मायलेकीला वाचवलं होतं.
देशभरातून 22 मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात 10 मुली तर 12 मुलांचा समावेश आहे.
10 वर्षांच्या झेनने वाचवली होती 17 आयुष्य
झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायालयातील वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांची मुलगी आहे. गेल्यावर्षी 22 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीला आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता तर 16 जण जखमी झाले होते. 16 व्या मजल्यावर राहणार्या झेनच्या घरातही आगीचा धूर पसरला. शेजारीपाजारीही किंचाळत बाहेर निघाले. पण काही जण धुरामुळे घुसमटू लागले. झेनने त्यांना घाबरून जाऊ नका असा सल्ला देत जेथे धूर कमी होता अशा ठिकाणी नेले. तिने मेन स्विच बंद केला आणि फायर ब्रिगेडला तेथे येण्याची सूचना दिली. अग्रिशमन दलाचे जवान तासाभराने तेथे पोहोचले. पण तोपर्यंत तेथे थांबलेल्या 17 जणांना तिने टॉवेल ओले करून त्याच्या विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करून श्र्वासोच्छ्वास करण्यास सांगितला. त्या सर्व नागरिकांनी झेनचा सल्ला मानला आणि धूर असूनही ते सर्व गुदमरून गेले नाहीत. शाळेत तिसर्या इयत्तेत शिकलेली गोष्ट तिने अंमलात आणून सर्वांचे प्राण वाचवले होते.
आकाशने वाचवले मायलेकीचे प्राण
आकाश खिल्लारे या 15 वर्षांच्या मुलाने त्याच्या गावाच्या नदीत बुडणार्या मायलेकींचा जीव वाचवला. औरंगाबादमधील त्याच्या गावातून तो शाळेत जात होता. तेथे दुधना नदीत त्याला जीव वाचवण्यासाठी ओरडणार्या महिलेचा आवाज ऐकू आला. तेथे आजुबाजूला कोणीही नव्हते. आकाशने आपले दफ्तर तिथेच टाकले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या 70 फूट खोल नदीत उडी घेतली. तो त्या महिलेजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की तिच्यासोबत एक लहान मुलगीही होती. त्याने आधी मुलीला वाचवले आणि पुन्हा नदीत उडी घेऊन महिलेलाही सुरक्षितपणे पाण्याबाहेर आणले. ती महिला तेथे कपडे धूत होती तेव्हा तिची तीन वर्षांची मुलगी पाण्यात पडली. महिलेला पोहता येत नसतानाही ती मुलीला वाचवण्यासाठी पाण्यात गेली होती.