राजस्थानमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. येथे प्रथमच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 199 जागांपैकी भाजपने 115 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये सांगानेरमधून भजनलाल शर्मा, विद्याधर नगरमधून दिया कुमारी आणि दुडू विधानसभा मतदारसंघातून प्रेमचंद बैरवा विजयी झाले. या तिन्ही नेत्यांना ही पदे देण्याची घोषणा मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आली.