एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणार्या सुपरचोरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीतून त्याला अटक केली आहे.
कुणाल असे या सुपरचोराचे नाव असून गेल्या 20 वर्षात एक हजराहून जास्त चोर्या त्याने केल्या आहेत. पोलिस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा रहिवासी असणार्या कुणालला दक्षिण दिल्लीमधील नेहरु प्लेस येथून अटक करण्यात आली. 13 ऑक्टोबर रोजी ही अटकेची कारवाई करण्यात आली. कुणालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
दिल्ली आणि जवळपासच्या परिसरामधील 62 कारचोरीच्या घटनांमध्ये कुणालचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपला आणि आपल्या गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. कुणालला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, इरशाद अली आणि मोहम्मद शादाब यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली.