अपंग कोट्याचा लाभ मिळवून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि यूपीएसी यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. आता पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर 21 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.
खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने तपास यंत्रणेला प्रकरण न्यायप्रविष्ट होईपर्यंत अटक करू नये असे निर्देश दिले आहेत.
खेडकर यांच्यावर UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 च्या अर्जात आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे . 31 जुलै रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) खेडकर यांची उमेदवारी रद्द केली. तसेच त्यांना भविष्यातील परीक्षांपासूनही रोखण्यात आले आहे.