ओडिशामध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाने मोहन मांझी यांना नेतेपदी निवडलं आहे. ते आता ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होतील.भाजपानं यावर्षी झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळवलं असून. बिजू जनता दलाचं गेल्या 24 वर्षांचं शासन आता समाप्त झालं आहे. ओडिशात भाजपाचं हे पहिलंच सरकार आहे.ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 147 पैकी 78 जागा जिंकल्या आहेत. तर BJD 51 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. राज्यात काँग्रेसला 14, सीपीआयएमला 1 जागा मिळाली आहे. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
मोहन माझी हे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. भुवनेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीनंतर संरक्षणमंत्र्यांनी घोषणा केली की, भाजप नेते मोहन चरण माझी हे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असतील. केव्ही सिंग देव आणि प्रवती परिदा यांची राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ओडिशातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 4.30 वाजता सुरू झाली. या बैठकीत राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादवही उपस्थित होते.
विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केल्यानंतर भाजप नेते आता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. ओडिशातही बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदीही उपस्थित राहू शकतात. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपने बीजेडी नेते नवीन पटनायक यांनाही आमंत्रित केले आहे. शपथविधी सोहळ्यामुळे ओडिशामध्ये 12 जून रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.