मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (2 ऑगस्ट) शिवसैनिकांनी हल्ला केला. पुण्याच्या कात्रज चौकात मोठा गोंधळ झाला.
या गोंधळानंतर उदय सामंत कोथरूड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
"माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलमुळे मी कुठेही घाई न करता थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस बॉलची स्टिक होती, तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता. ते मला शिव्या घालत होते. दुसऱ्या बाजूला 50 ते 60 लोकांचा मॉब होता", असं उदय सामंत यांनी सांगितलं.
"मी डाव्या बाजूला बघितलं, जेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होते त्यांच्या हातात सळई होते. ज्याने हा प्रकार केला होता ते काही लोकांना शूटिंग करायला सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन गाडीवर चढून मारण्याचा प्रयत्न केला", अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
हा ताफा अडवल्याचं शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते नाकारत असले तरी ते धादांत खोटं असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलं.
"माझ्याकडे काही फोटो आहेत. हे फोटो मी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतो. हातात बघा काय आहे. शिवसैनिक सभांना हत्यारं घेऊन जात असतील तर ती सभा म्हणावी का? हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलं पाहिजे", असं उदय सामंत यांनी म्हटलं.
'गद्दार म्हणता तरी शांत आहे... शिव्या घालता तरी शांत आहे... आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे... लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही… काळ ह्याला उत्तर आहे… अंत पाहू नका!' असं ट्वीटही उदय सामंत यांनी केलं आहे.
हा भ्याड हल्ला निंदनीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, जे जे कोणी चिथावणीखोर वक्तव्यं करतील, पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील.
"हे राज्य सर्वसामान्य जनतेचं आहे. कोणीही जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल. कायदा सुव्यवस्था प्रत्येकानं राखली पाहिजे," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.
आम्ही आमच्या मार्गाने जात आहोत. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू वये. अशा भ्याड हल्ल्यांना आम्हीही तशाच प्रकारे उत्तर देऊ शकतो. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांना शोधण्यात येईलच त्यानंतर मग आम्ही पाहू, असं भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
ही शिवसेनेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात यांनी ही शिवसेनेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये रोष आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या समाचार घेण्यासाठी शिवसैवनिक सज्ज झाले आहेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्व लोकांना अशाच प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.
शिवसैनिकांचा हा हल्ला नाही तर त्यांची ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे. ज्यांनी गद्दारी केलीय त्यांच्याविरोधात असा रोष व्यक्त होणारच. प्रत्येक जिल्ह्यातून अशी प्रतिक्रिया येणार," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात यांनी व्यक्त केली आहे.