Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणे जिल्हा बदलतोय त्यावर एक रिपोर्ट

thane
, सोमवार, 3 जुलै 2023 (12:35 IST)
R S
A report on Thane बदल करण्याची दृष्टी, त्यासाठी अपार कष्ट घेण्याची प्रवृत्ती आणि आपलं शहर, जिल्हा आणखी चांगला कसा होईल, यासाठीची धडपड यामुळे काय बदल होत आहेत हे पहायचे असेल तर ठाण्याकडे पाहायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून व धोरणातून ठाण्याचा कायापालट होत आहे. ठाणे जिल्ह्याच्या कक्षा आता रुंदावत असून पायाभूत सुविधा, विकास कामे, वाहतुकीच्या साधनांचे विणले जाणारे जाळे यामुळे आता ठाणे हे महामुंबईच्या तोडीचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
 
देशाची आर्थिक राजधानी, राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मुंबई लगतचा जिल्हा म्हणजे ठाणे होय. ठाण्यातूनच मुंबईला ये-जा करावी लागते. जसजशी मुंबई वाढत गेली तसतसे ठाणे ही विस्तारत गेला. मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या या जिल्ह्यात शहापूर व मुरबाड सारखा दुर्गम आदिवासी भागही आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास पाहताना सर्वच अंगाने पहावे लागते. हे जाणून घेऊनच ठाणे शहरातील आमदार तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीपासूनच ठाण्याच्या विकासासाठी काम करण्यास सुरूवात केली. राज्याचा कारभार हाती आल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विकास कामांना आणखीन गती आली. त्यातून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे रुपास येऊ लागले. महिला, ज्येष्ठ, तरुण, कष्टकरी, कामगार, नोकरदार अशा सर्वच सर्वसामान्यांचा विचार करून राज्य शासनाचे निर्णय होत आहेत.
 
मुंबईत काम करणारा बहुतांश नागरिक हे राहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई या भागास पसंती देताना दिसतो. त्यातही मध्यमवर्गीय नागरिक हे येथील राहणीमान, परवडणारी घरे, वाहतुकीच्या सुविधा यामुळे या भागास मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला. यातून ठाणे जिल्ह्याचे नागरिककरण मोठ्या प्रमाणात झाले. या नागरिकणासाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, वीज आदी पायाभूत सुविधा, वाहतुकीची साधने आदींचा विकास करणे आवश्यक होते. मुंबईचा बराचसा भार हा ठाणे जिल्ह्यावर येत असल्यामुळे या पायाभूत सुविधा पुरविणे हे एक आव्हान होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत हे आव्हान पेलले. त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आज ठाण्यात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडत आहे.
 
वाहतूक साधनांचे जाळे
 
गेल्या काही वर्षात ठाण्यातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे होत हेत. त्यामध्ये मेट्रो मार्ग, जलवाहतूक, विविध उड्डाणपुलांचे काम यांचा समावेश आहे.
 
ठाणे शहर व परिसरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ या मार्गाचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. हा मार्ग आता गायमुखपर्यंत वाढविण्यात येत आहे. या मार्गामुळे लोकलवरील ताण कमी होण्यास तसेच या मार्गावरील रस्त्यांवरील वाहने कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे ते भिवंडी मेट्रो लाइन 5 च्या कामासही वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत 72 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
 
याबरोबरच आता ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर याचे काम सुरू होणार आहे. तसेच कल्याण – तळोजा या 20.75 किमी अंतराच्या मेट्रो 12 साठी या अर्थसंकल्पात 5,865 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गायमुख ते मीरारोड या मेट्रो 10 मार्गासाठीही 4,476 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अशा विविध ठिकाणांना जोडणाऱ्या विरार -अलिबाग बहुउद्देशीय मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.
 
ठाणे जिल्ह्यातून नाशिक, अहमदाबाद, पुणे आदींकडे जाणारे महामार्ग आहेत. मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे घेण्यात आली आहेत. यातील ठाणे आणि मुलुंड या दोन शहरांना जोडणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे ठाणे आणि मुलुंड या शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. दोन्ही बाजूच्या प्रत्येकी दोन अशा चार मार्गिका सुरू केल्यानंतर लवकरच मधील चार मार्गिकांचे काम देखील हाती घेण्यात येणार. एकूण आठ मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
 
ठाणे नवी मुंबईचा प्रवास सुखकर व जलद होण्यासाठी ऐरोली काटई नाका मुक्त मार्गावर चार लेनचा 12.3 किमीचा रस्ता तयार होत असून या दरम्यानच्या टनेलचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ठाणे सागरी मार्ग ओळखला जाणार आहे. एकूण 13.30 किमी चा हा प्रकल्प आहे. सध्या सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे.
 
कल्याण रिंगरोड, कल्याण शिळफाटा रस्ता, कळवा खारीगाव उड्डाणपूलाची उभारणी, मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपूल, कल्याणमधील पत्री पूल व दुर्गाडी पुलांची कामे झाली आहेत. यासह मीराभाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका येथेही मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.
 
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई परिसराचाही मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. नवी मुंबईतून मुंबईला जाणारे नागरिक रस्ते व उपनगरीय रेल्वे मार्गाचा वापर करतात. या नागरिकांना जलदगतीने मुंबईला पोहचता यावे, यासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर वॉटर टॅक्सीद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे.
 
आरोग्यसेवेसाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
 
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच शेजारच्या पालघर जिल्ह्यतील नागरिकांना आरोग्य विषयक सेवांसाठी ठाण्यामध्येच यावे लागते. त्यामुळे ठाण्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आजारपणासाठी विठ्ठल सायण्णा जिल्हा रुग्णालयाकडेच यावे लागते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या व्यवस्थेमुळे आरोग्य सेवा देण्यास अडचणी येत होत्या. मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरण व नवीन इमारत तसेच या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. नुकतेच या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजनही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले.
 
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी सुद्धा जिल्हा वार्षिक निधीतून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. ठाणे शहराबरोबरच शहराच्या आजूबाजूच्या परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. यामुळे अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर व त्या परिसरातील इतर भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे.
 
जिल्हा नियोजनसाठी सर्वाधिक निधीची तरतूद
 
ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच आग्रही असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना तसेच विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनांसाठी सन 2022-23मध्ये जिल्ह्याला 618 कोटी रुपयांचे नियतव्य प्राप्त झाला होता. हा संपूर्ण 100 टक्के निधी जिल्ह्याने खर्च केला आहे. तर सन 2023-24 या वर्षासाठी एकूण 750 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी रुपयांनी हा निधी जास्त आहे. या वर्षी गडकिल्ले संवर्धनासाठी नव्याने 16 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे, पालकमंत्री श्री. देसाई यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे.
 
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा सर्वेक्षण करण्यात आले. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने जिल्हा वार्षिक निधीतून फिरती शाळा प्रकल्प सुरू केला. यातून रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना शिक्षणाची गोडी लावली. यामुळे या वर्षी तब्बल 145 मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास महिला व बालविकास कार्यालय यशस्वी झाला आहे. या मुलांचे महानगरपालिका व खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यामुलांना मदत व्हावी, यासाठी विभागाच्या वतीने गणवेश, शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले आहे. राज्यात हा पहिलाच असा प्रयोग असून पुढील काळात आणखी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी स्तनदा मातांना मुलांना खाऊ घालणे व स्तनपान करण्यास अडचणी येतात. हे ओळखून शासकीय कार्यालये, पोलीस स्थानक, रेल्वे व बस स्थानक आदी ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत.
 
 सर्वात मोठ्या क्लस्टरच्या कामास सुरूवात
 
ठाणे शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरातील निम्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही धोकादायक इमारती व झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहे. नागरिकांनी गरजेपोटी इमारती उभारल्या आहेत. अनेक भागात दाटीवाटीने या इमारती उभारल्याचे दिसते. शहरातील अनेक भागात जुन्या, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती, अनधिकृत घरे तसेच दाटीवाटीने वाढलेल्या झोपडपट्ट्या यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा, अपुऱ्या सोयीसुविधा, अपुऱ्या जागेमुळे सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी, यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटची आवश्यकता होती. या नागरिकांना चांगले घर मिळावे, धोकादायक इमारतींमधून त्यांची सुटका व्हावी, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न होते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील इमारतींचा पुनर्विकास कसा करायचा हा प्रश्न होता. अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी समूह विकास प्रकल्पाचा म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंटचा आग्रह वारंवार धरला. त्यांच्या संकल्पनेतून यासाठी नियमावली तयार करण्यात आली आणि आता प्रत्यक्ष कामास सुरूवात करून अनेक वर्षांपासूनची त्यांचे स्वप्न मूर्त स्वरुप येत आहे. राज्य शासनाने समूह विकास प्रकल्पाला मान्यता दिली आणि ठाण्यातील किसन नगर भागात त्याच्या कामास सुरुवातही झाली.
 
क्लस्टर विकास प्रकल्पामुळे आता जुन्या, मोडकळीस आलेल्या, धोकादायक तसेच अनधिकृत इमारतीत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे चांगले घर मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये इमारतींबरोबर परिसराचाही विकास होणार असून प्रशस्त रस्ते, उद्याने, वाहनतळ, खेळाची मैदाने यासह इतर सार्वजनिक सुविधा निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर लहान व्यवसायालाही चालना मिळणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
 
ठाणे महानगरपालिका, सिडको व महाप्रित या संस्थांच्या माध्यमातून क्लस्टरचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सुमारे १५०० हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. क्लस्टरमुळे ठाणेकरांच्या उत्तम राहणीमान, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित आयुष्याची सुरूवात होणार आहे.
 
ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरात असलेल्या दिवा भागातील अनधिकृत इमारतींचा मोठा प्रश्न होता. मुख्यमंत्री महोदयांनी हा प्रश्न मार्गी लावतानाच सुनियोजित व सुविधायुक्त दिवा शहराच्या निर्मितीसाठी येथेही समूह विकास प्रकल्प राबविण्याची घोषणा केली आहे.
 
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’मधून होतोय शहराचा कायापालट
 
ठाणे शहर सुशोभित व्हावे, शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे हे अभियान हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ ठाणे, स्वच्छ शौचालय, सुंदर ठाणे ही कामे करण्यात आली आहेत.
 
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानाअंतर्गत शहरात रस्त्यांचे मजबूत जाळे उभारण्यात येत आहे. हे रस्ते खड्डेमुक्त राहण्यासाठी काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहे. यासाठी सुमारे 610 कोटींचा निधीतून 282 रस्त्यांची कामे हाती घेतली असून ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
 
सुंदर ठाणे उपक्रमाअंतर्गत ठाणे महापालिका हद्दीतील प्रवेशद्वारांचे सुशोभिकरण, प्रमुख रस्त्यांवर सूचना फलक लावणे, कचरा कुंडीची सुविधा, सुशोभित वाहतूक बेटे तयार करणे, पूल, उड्डाणपूल, खाडीवरील पूल या ठिकाणी रंगीत विद्युत रोषणाई, मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड ही कामे करण्यात आली आहेत. तसेच ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील तलावांचे सुशोभिकरण, संवर्धनाची कामे हाती घेतली आहेत. स्वच्छ ठाणे अंतर्गत सार्वजनिक रस्त्यांची दिवसातून दोन वेळेस शहरात सफाई केली जात आहे. नवीन कचरा संकलन, नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणीची कामे हाती घेतली आहेत.
 
स्वच्छता व सौदर्यीकरणाबाबत शहराने कात टाकली असून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाअंतर्गत स्वच्छ शौचालय अभियान हाती घेण्यात आले होते. यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सुमारे 98 कोटींचा निधी दिला होता. या अभियानात शहरातील 821 सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. शहरातील ही कामे नागरिकांना दृश्यस्वरुपात दिसायला हवीत, यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त आग्रही असून त्यांनी सातत्याने या कामांवर स्वतः देखरेख ठेवली आहे.
 
ऐतिहासिक ठाणे शहराचा कायापालट आता होत आहे. मुंबईबरोबरच आता एक मोठे महानगर म्हणून ठाण्याकडे पाहिले जात आहे. गेल्या वर्षभरात मेट्रोचे जाळे, रस्ते, उड्डाणपूलाची कामे, जलवाहतुकीला मिळालेली चालना आदींमुळे ठाणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार हे शिंदे सरकारसाठी धोकादायक : सामना