महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कोकेनची तस्करी करताना एका विदेशी नागरिकाला रंगेहाथ पकडले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी ब्राझीलचा नागरिक असून त्याने आपल्या पोटात 10 कोटी रुपयांचे 1 किलो कोकिन लपवले होते. त्याला ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोपींचा शोध घेतला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार्लोस लिअँड्रो दा सिल्वा ब्रुनो (32) असे या आरोपीचे नाव असून त्याला ड्रग्ज बाळगल्याच्या संशयावरून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आले.सुरुवातीला तो अस्पष्ट उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने तस्करीसाठी ड्रग्सच्या कॅप्सुलचे सेवन केल्याचे कबूल केले. नंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रुग्णालयात दाखल केले. आरोपीने एकूण 110 कॅप्सूल गिळल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्या पोटातून कॅप्सूल काढण्यात आले असून कोकेन जप्त केले आहे. त्याच्यावर एनडीपीसी कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची पुढील चौकशी केली जात आहे.