जालना राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता दोन आठवड्यावर येऊन ठेपला असून यंदा दिवाळीपूर्वीच साखर उत्पादनाला सुरुवात होणार आहे. अनेक कारखाने साखर उत्पादनाबरोबरच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असतात. काही कारखान्यांनी ऊस तोड कामगारांसाठी साखर शाळा सुरू केल्या असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथील समृद्धी साखर कारखान्याने एकावेळी घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी साखर कारखान्याकडून एक पोते म्हणजे क्विंटलभर साखर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सतीश घाटगे यांनी सांगितले की, यंदा कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ लवकरच होणार असून दिवाळीपुर्वी साखर गाळप सुरु होईल, तसेच तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी यंदा १०० किलो म्हणजे १ पोते साखर घरपोच देण्यात येणार आहे. तर बाकीच्या ऊस उत्पादक सभासदांना ५० किलो साखर माफक दरात घरपोच देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर येणाऱ्या हंगामापासून शेतकऱ्यांना आपले कर्तव्य म्हणून ही मदत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे केवळ मराठवाड्यातील साखर कारखाने नव्हे तर राज्यभरातील सहकारी साखर कारखान्यांच्यापैकी प्रथमच या कारखान्यात असा आगळावेगळा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. सभासद शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नात मोफत इतकी साखर मिळणार असल्याने सभासदांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. तसेच दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.
समृद्धी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ झाल्यावर संपूर्ण ऊस गाळप करून कारखाना पाऊस पडेपर्यंत चालवण्यात येईल. तसेच साखर उतारा जास्त कसा येईल जेणेकरून परिसरातील इतर कारखान्यांपेक्षा दर समृद्धीच्या शेतकऱ्यांना अदा करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अतिरिक्त पावसामुळे जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. गोदावरी नदीवरील सर्व बंधारे, छोटी मोठी धरणे १०० टक्के भरली असल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढणार असून कारखाना विस्तारित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातील महाराष्ट्राचा वाटा ६२ लाख मेट्रीक टन असल्याची माहिती देण्यात आली आहे.
देशामध्ये सर्वोच्च साखर उत्पादक राज्य महाराष्ट्र असून सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी पातळी गाठणार आहे. कारण ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही मोठी वाढ होणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामात सहकारी आणि खासगी २०३ साखर कारखाने सुरु होणार आहेत. यावर्षी १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.