आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुसद येथील जाहीर सभेत दिली. हे शेतकऱ्यांचे सरकार नाही तर मुठभर लोकांचे सरकार आहे. सत्तेत असून शिवसेना मोर्चा काढते लोकांना दुधखुळे समजता का? असा संतप्त सवाल पवार यांनी केला.
राज्य कुठल्या दिशेने चाललंय? माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, स्व. सुधाकर नाईक, खा. शरद पवार यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी राज्य कंगाल करून टाकले आहे. या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला ते जाहीर करावे, असे जाहीर आव्हान पवार यांनी सरकारला दिले.
मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत. मात्र वाचाळवीर काहीही बोलतात. राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. माजी केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. चौकशी करा पण ज्यापद्धतीचे राजकारण केले जात आहे, ते योग्य नाही असेही पवार म्हणाले.
शेतकऱ्यांची कधीच कुणी अशी क्रूर थट्टा केली नाही जेवढी या भाजपा सरकारने केली आहे, असा थेट आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांची जनतेशी काय बांधिलकी आहे हे पूरग्रस्तांविषयीच्या त्यांच्या असंवेदनशीलतेवरून लक्षात येते असेही कोल्हे म्हणाले. पाच वर्ष कचाकचा भांडायचं आणि नंतर आमची युती झाली आहे असं सांगायचं असा उपरोधिक टोला कोल्हे यांनी शिवसेना भाजपा युती युतीबाबत लगावला. यावेळी आमदार मनोहर नाईक, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनीही आपले विचार मांडले.