Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अन् फडणवीस म्हणाले, 'पवारसाहेब आपल्या पाठिशी' , अकोल्यात नेमकं काय घडलं?

devendra fadnavis ajit panwar
, गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:06 IST)
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार साहेब आपल्या पाठिशी आहेत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील भाषणात केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून क्षणभरासाठी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
 
देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेले पवार साहेब म्हणजे कोण, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. परंतु देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ या गोष्टीचा खुलासा करत पवार साहेब म्हणजे अजित पवार, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
 
महायुतीचे अकोल्यातील लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी बुधवारी अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता आली पाहिजे, असे म्हटले. विरोधक मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवंय? या देशाचा विकास कोण करु शकते?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
 
देश तर सोडा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. पाकिस्तान आणि चीन हे देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. असा मजबूत भारत पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केला आहे. आज चंद्रावर आपलं यान उतरलं आहे, आपण सूर्याला गवसणी घातली आहे. कालपर्यंत प्रगत देशांना जे जमत होतं, ते भारतालाही जमू लागले आहे. इतर देश म्हणत आहेत की, आता भारताशिवाय जगाची कल्पना करता येणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी भारताला या स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधान मोदींच्या बाजूने उभे राहायचे आहे, असे फडणवीसांनी म्हटले.
 
लोकांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली पाहिजे. आपल्या अनुपला दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीत आला की, आम्ही सगळे त्याच्या पाठिशी आहोत. शिंदे साहेब असतील, आमचे पवार साहेब असतील, आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. पवार साहेब म्हणजे कन्फ्युजन नको, पवार साहेब म्हणजे अजितदादा, असे फडणवीस यांनी म्हटले. आमचे महायुतीचे नेते अनुपच्या पाठिशी आहेत, आम्ही अनुपला विकासात मदत करु. मी विश्वासाने सांगतो की, आमच्या संजयभाऊंनी 15 वर्षे विकास केला, पण अनुप हा रेकॉर्ड तोडेल. बापापेक्षा बेटा सवाई निघेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Edited by Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आधी स्टार प्रचारकांमधून नाव काढले, आता काँग्रेसमधून काढतील, संजय निरुपम यांचे जोरदार प्रत्युत्तर