राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने अनेक निर्बंध मागे घेतले असून त्यासंबंधीची नियमावली नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.
गृह विभागाने करोनाच्या नियमांचं पालन करावं तसंच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा असं आवाहन केलं आहे. रंग लावणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. शिमगा साजरा करत असताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात नेली जावी अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नियमात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरणही गृह विभागाने दिलं आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा त्यांनी केली होती. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली होता. दरम्यान सरकारने निर्बंध मागे घेतल्यानंतर त्यांनी स्वागत केलं असून इतक्या उशीरा शहाणपण सुचलं असा टोलाही लगावला आहे.