महाराष्ट्र सरकारने आता मृतदेहाची करोना चाचणी न घेण्याचे जाहीर केले आहे. याबाबत अनेक संभ्रम असल्याने इथून पुढे केवळ न्यायवैद्यक प्रकरणे वगळता मृतदेहांचे नमुने चाचणीसाठी घेतले जाणार नाही.
करोना साथीच्या उद्रेकामध्ये फक्त न्यायवैद्यक प्रकरणांमध्येच शवविच्छेदन करावे. अन्य मृतदेहाची बाह्य़तपासणी, रुग्णांची माहिती, इतर आजार, मृत्यूच्या आधीची वैद्यकीय स्थिती यावरून मृत्यूचे कारण देण्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा मृतदेह असल्यास किंवा करोनाची लक्षणे असल्यास चाचण्या केल्या जात होत्या. परंतु यांचे अहवाल येईपर्यत मृतदेह रुग्णालयाच्या ताब्यात असल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत होते. शिवाय मृत्यूचे कारण देण्यासही वैद्यकीय अधिकारी तयार होत नसल्याने काही वेळेस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत असत.
आता मृतदेहाच्या चाचण्यांबाबतचा संभ्रम दूर करत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. केवळ न्यायवैद्यक प्रकरणे सोडता मृतांची करोना चाचणी करू नये, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.