Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुक्ता टिळक यांचं निधन, नगरसेविका ते आमदार...

mukta tilak
, गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (18:51 IST)
facebook
पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाचं वृत्त आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या.
 
मुक्ता टिळक या बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर, आज (22 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली.
 
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत.
 
पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयतून पुढील शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली होती. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली होती.
 
नगरसेवक ते आमदार
मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या.
 
आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या.
 
पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाल्या.
 
यानंतर, महापौरपदावर असतानाच 2019 साली त्यांना भाजपने पुण्याच्या कसबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता.
 
राज्यसभा-विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी रुग्णवाहिकेतून..
आमदार मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून येऊन राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदान केलं होतं.
 
राज्यसभा निवडणूक 10 जून 2022 रोजी तर विधानपरिषद निवडणूक 20 जून 2022 रोजी झाली होती. या निवडणुकीत भाजपने आश्चर्यकारकरित्या विजय प्राप्त केला होता.
 
त्यावेळी मुक्ता टिळक यांच्याप्रमाणेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीसुद्धा रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केलं होतं.
 
राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने जिंकल्यानंतर त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. त्यावेळचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेकांनी त्यांच्या पक्षनिष्ठेला सलाम केला. तसंच, त्यांच्या तब्येतीबाबत काळजीही व्यक्त केली.
 
त्यानंतरही आजपर्यंत मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र, अखेर त्यांची लढाई आता संपली असून त्या चिरनिद्रेत गेल्या आहेत.
 
'राज्याला महिला मुख्यमंत्री लाभली नाही, याची खंत वाटते'
"महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री लाभली नाही, याची खंत वाटते," असं वक्तव्य मुक्ता टिळक यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र-महाराष्ट्र या कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.
 
विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातील चर्चासत्रात तत्कालीन भाजप महापौर म्हणून त्या सहभागी झाल्या होत्या.
 
यावेळी मुक्ता टिळक यांनी म्हटलं होतं, “संघटनेत 33 टक्के महिला असल्या पाहिजेत असं भाजपचं धोरण आहे.  जास्तीत जास्त महिला आमदार पक्षाच्या निवडून आल्या आहेत. ज्या प्रकारे पुरुष नेत्याशी कार्यकर्ते मोकळेपणाने वागू शकतात. त्याप्रमाणे काहीवेला महिला नेत्यांशी बोलू शकत नाहीत. महिलांच्या मागे पुरूषच बऱ्याच वेळा काम करत असतो. राजकारणात काय चाललं आहे याचं ज्ञान महिलांनी स्वतः मिळवलं पाहिजे. 
 
राजकारणात तुम्ही चांगलं काम करत असलात तरी अनेक विषय येऊन चिकटतात. अशा वेळी आपण आपल्याला सिद्ध करण्यात आपला वेळ जातो. त्यामुळे स्पष्ट दिशेने पुढे गेल्यास महिलांना राजकारणात चांगली संधी आहे. 
 
महिलेला कसं तोलायचं ही समाजाची धारणा. महिलेच्या बाबतीत चारित्र्य हा मुद्दा काढला जातो. टोमणे मारून बोलण्याची समाजाची रित आहे, असं स्पष्ट मत त्यांनी नोंदवलं होतं.  
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुढील 8 दिवस थंडीची लाट वर