राज्यातील नायब तहसीलदारांना ग्रेड पे संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी मंगळवारी (ता. ५) सामूहिक रजा आंदोलन केले.
त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २८ तारखेपासून बेमुदत काम बंदचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांनी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नाशिक विभागातर्फे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.
त्यात राज्यातील नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ यांची ४८ हजार रुपये ग्रेड पे लागू करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या एप्रिलमध्ये दिले. मात्र, शासन स्तरावर त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
शासनाने ग्रेड पेची मागणी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा येत्या १८ तारखेला शासनाला स्मरणपत्र देण्यासाठी दोन तास धरणे आंदोलन, तसेच २८ तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पंकज पवार, शरद घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
Edited by -Ratnadeep Ranshoor