Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकचा ब्लफमास्टर: मुथूट फायनान्सलाच घातला 2 लाखांचा गंडा; आठवड्यात दुसरा गुन्हा

नाशिकचा ब्लफमास्टर: मुथूट फायनान्सलाच घातला 2 लाखांचा गंडा; आठवड्यात दुसरा गुन्हा
, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:40 IST)
नाशिक बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेले सोने मुथूट फायनान्समध्ये ठेवण्याचा बहाणा करून भामट्याने मुथूट फायनान्सलाच दोन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
संशयित भामट्याने गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा अशारीतीने गंडा घातला असून, पहिल्या गुन्ह्यात त्याने एकाला तारण ठेवलेले सोने सोडवून आणतो असे सांगून दोन लाखांना गंडा घातला. दरम्यान, संशयिताला मौजमजा करण्याची सवय असल्याने पंचवटीसह गंगापूर आणि शहर गुन्हे शाखेची पथके या भामट्याचा शोध घेत आहेत.
 
प्रथमेश श्याम पाटील (रा. काझी गढी, नाशिक) असे भामट्याचे नाव आहे. कृष्णाजी देविदास शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रथमेश हा मंगळवारी (ता. २१) भाभानगर येथील मुथूट फिनकॉर्प शाखेत गेला.
प्रतिनिधी शिंदे यांची भेट घेत त्याने थत्तेनगर येथील बजाज फायनान्सकडे सात तोळे तारण ठेवल्याची पावती दाखविली. तसेच, या बदल्यात बजाज फायनान्स दोन लाख रुपये देत असल्याचे सांगत, ‘हेच सोने मी मुथूट फायनान्सकडे तारण ठेवले, तर तुम्ही मला किती पैसे द्याल’ असे विचारले.
 
त्यावर शिंदे यांनी २ लाख ७० हजार रुपये देऊ असे सांगितले. प्रथमेश याने होकार दर्शवून शिंदे यांच्यासह गंगापूर रोडवरील क्रोमा शोरूम येथील बजाज फायनान्सचे कार्यालय गाठले. त्या वेळी ‘मी माझे सोने सोडवून आणतो, मला दोन लाख रुपये द्या, कारण तुम्हाला तिथे कुणीही ओळखून घेतील.
 
यातून व्यवहारात गडबड होईल असे त्याने शिंदे यांना विश्‍वासात घेऊन सांगितले. त्यानुसार शिंदे यांनी दोन लाख रुपये देताच प्रथमेश हा बजाज फायनान्स कार्यालयाच्या दिशेने पायऱ्या चढण्याचा बहाणा करून पार्किंगमधून पोबारा केला.
 
शिंदे व सहकारी प्रथमेशची वाट पाहत असताना त्यांना तो आढळून आला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद केली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक बैसाने हे करीत आहेत.
 
मौजमजेवर पैशांची उधळपट्टी:
संशयित प्रथमेश हा पूर्वी गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील बजाज फायनान्स शाखेत कार्यरत होता. वैयक्तिक, गृहकर्जाच्या फाईल्स मंजूर करून देणे, सोने तारण ठेवणे व काढणे तसेच मॉर्गेज यांची माहिती होती.
 
काही कारणास्तव त्याने नोकरी सोडून एजंटगिरी सुरू केली. हे करत असतानाच मद्य व जुगारात पैसे उडविण्याचा नाद लागला. संशयित प्रथमेशवर यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल असून ‘तुमचे तारण ठेवलेले सोने कोणताही जादा चार्ज न लागू देता परत आणून देतो’, असे म्हणून गेल्या १७ तारखेला प्रथमेशने वैभव होनराव यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता थेट फायनान्स कंपनीलाच गंडा घातला आहे. पंचवटी, गंगापूर व शहर गुन्हे शाखेची पथक त्याच्या मागावर आहेत. मौजमजेसाठी पैशांची उधळपट्टी करण्याचा त्याला नाद आहे. यातूनच तो नवीन ग्राहक शोधतो.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागेचा वाद जीवावर बेतला! महिलेची चाकू भोकसून हत्या