Rain In Maharashtra :येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टी पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा धो धो कोसळण्याची शक्यता आहे. बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
बुधवारी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तचे कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गुरूवारी 3 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor