पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना कोपरखळी मारली आहे. पार्ले कट्टा कार्यक्रमात पाऊस पडू लागला तेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितलं की नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो आहे पावसाचं काही खरं नाही. त्यावर गडकरी उत्तर दिले की, “पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं पत्रकार म्हणतात” त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वतः नितीन गडकरींनाही हसू आवरलं नाही.
कार्यक्रमात अच्छे दिन आले का? असा प्रश्न जेव्हा नितीन गडकरींना विचारण्यात आला तेव्हा गडकरी म्हणाले की,” अच्छे दिन तर आलेच आहेत, पण अच्छे दिन ही संकल्पना प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून असते. ५०० स्क्वेअर फुटांच्या घरात माणूस म्हणतो की मी सुखी आहे, तर अनेकदा चार फ्लॅट असणारा माणूसही म्हणतो की मी समाधानी नाही. तसंच तुम्ही सरकार म्हणून लोकांच्या जेवढ्या अपेक्षा पूर्ण करता तेवढ्या त्याच्या अपेक्षा वाढत जातात. अच्छे दिन ही संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहे ” असे सांगतिले.