नाशिक सेन्ट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात तुरुंगाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
नाशिकच्या सेन्ट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यास मारहाण करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात तुरुंगाधिकाऱ्यांसह उपनिरीक्षक व शिपायाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जिनल विन्सिल मिरांडा (वय 39, रा. कासार वडवली, ठाणे पश्चिम) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यात म्हटले आहे, की पती विन्सिल रॉय मिरांडा हा नाशिकरोड सेन्ट्रल जेलमध्ये विशेष मोक्कांतर्गत गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असताना दि. 24 डिसेंबर 2016 रोजी शिक्षाबंदी सेपरेट यार्ड क्रमांक 1 मधील सेल नंबर 72 मध्ये आराम करीत होते.
त्यावेळी तुरुंगाधिकारी खारतोडे यांनी विन्सिल मिरांडा याला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल देऊन “तुझी जेलमधून लवकर सुटका होण्यासाठी चांगला रिपोर्ट देऊ,” असे प्रलोभन दाखवून मोबाईल विकून टाक, असे म्हटले; परंतु मिरांडा याने त्यास नकार दिला.
याचा राग आल्याने तुरुंगाधिकारी खारतोडे यांनी मिरांडा याला गुन्ह्यात गुंतविण्यासाठी हा मोबाईल फोडून स्वत: मोबाईलची बॅटरी ही शिक्षाबंदीने जवळ बाळगून ती सेलमधील शौचालयात टाकली. असे वॉकीटॉकीवरून संशयित आरोपी तुरुंगाधिकारी आहिरे, मयेकर, बाबर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी फड, खैरगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुपारे, शिपाई दातीर यांना कळविले. त्यानंतर खारतोडे, अहिरे, मयेकर व बाबर यांनी फिर्यादीच्या पतीस कारागृहातील टॉवरवर नेऊन त्यास लाकडी व प्लास्टिक काठीने, तसेच हातापायाने मारहाण करीत शरीरावर गंभीर दुखापती केल्या, तसेच या तुरुंग अधिकार्यांच्या इतर सहकार्यांनीसुद्धा कोरंदी यार्डमध्ये दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर जनरल बॅरेकमध्ये असलेले शिक्षाबंदी हे तुरुंगाधिकार्यांच्या सांगण्यावरून विन्सिल मिरांडा याच्याबरोबर गोंधळ घालतील व आरोपी, तुरुंगाधिकारी हे अलार्म करून मिरांडा यास जिवे मारतील, यासाठी त्याला जनरल बॅरेकमध्ये ठेवले होते. त्यावेळी मिरांडा याने याबाबत न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनबाबत तुरुंगाधिकारी खारतोडे यांनी मिरांडा यास दमदाटी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच जातिवाचक शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर सेन्ट्रल जेलमधील वैद्यकीय अधिकार्यांनीदेखील उपचाराच्या कागदपत्रात शिक्षाबंदी आरोपीस झालेल्या मारहाणीच्या शरीरावरील दुखापती नमूद केल्या नाहीत. याविरोधात मिरांडा यांच्या पत्नी जिनल मिरांडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयात चौकशी अर्ज दाखल केला होता…
त्यानुसार दि. 5 मे 2017 रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने नाशिकरोड पोलीस ठाण्यास दिलेला आदेश उशिराने प्राप्त झाला. त्याबाबत तत्कालीन तपासी अंमलदारांनी या गुन्ह्यातील आरोपी हे शासकीय नोकर असल्याने त्याबाबत पोलीस आयुक्त, तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्याकडे अभिप्रायाकरिता कागदपत्रे पाठविली. त्यावरून जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशान्वये तुरुंग अधिकार्यांसह आठ जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३०७, ३२६, ३२४, २९५ (अ), १२० (ब), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून (गुन्हा रजिस्टर नंबर: ०२१६/२०२२) , पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुनतोडे करीत आहेत.