नाशिक (प्रतिनिधी): शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्यांना सुरवात होत असून, या कालावधीत प्रवासी संख्येत वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर नाशिकहून विविध मार्गांसाठी धावणाऱ्या एसटी बसगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, पुण्यासाठी दर अर्धा तासाला बसगाडी सोडली जाणार आहे.
दिवाळीच्या हंगामात व उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असते. सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देताना, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळातर्फे या कालावधीत जादा बसगाड्या सोडल्या जात असतात.
यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार नाशिक विभागामार्फत धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बोरिवली या मार्गांवर दर अर्ध्या तासाच्या अंतराने फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
तसेच नाशिक -कसारा मार्गावरदेखील अतिरिक्त फेऱ्या सुरु केल्या आहेत. मुंबई -नाशिक मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उबरमाळी रेल्वे स्थानक ते नाशिक अशी नवीन सेवादेखील सुरु केलेली आहे. या व्यतिरिक्त सटाणा ते कल्याण फेरी प्रवाशांच्या मागणीनुसार सुरु केली आहे.
सातपूर बसस्थानक सेवेत दाखल:
महामंडळाचे सातपूर बसस्थानक नुकतेच प्रवाशांच्या सेवेस दाखल झाले आहे. त्र्यंबक येथून विविध मार्गावर सुटणाऱ्या व त्र्यंबककडे येणाऱ्या सर्व बसगाड्या सातपूर बसस्थानक येथे जाऊन प्रवासी चढ -उतार करणार आहेत. यामुळे सातपूर परिसरातील नागरिकांची सुविधा होणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor